पुण्यातील हडपसरमध्ये धमक्यांना घाबरून तरूणाची आत्महत्या

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पूर्वी झालेल्या वादातून एका तरुणाला धमकावत या परिसरात राहिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देऊन सतत त्रास देत असल्याने त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हडपसर परिसरात ही घटना घडली आहे. पोलीसांनी तिघांना अटक केली आहे.

गणेश भीमा देवकुळे (वय 37 ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी याकुब मुस्तफा शेख (वय 64), सलील याकुब शेख (वय 23), आतिफ याकुब शेख (वय 26) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. याबाबत 60 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या मुलासह हडपसर येथे राहतात. दरम्यान आरोपी व त्यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. याचा राग आरोपींच्या मनात होता. त्यांनी यावरूनच गणेश याला घरी बोलावून या परिसरात रहायचे नाही. इथे राहिल्यास मारून टाकीन अशी धमकी दिली. त्यानंतर सतत त्रास देऊन शिवीगाळ करत असे. या त्रासाला कंटाळून गणेश यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.