पुण्यातील धायरी परिसरात तरूणाची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील आत्महत्या सत्र थांबत नसून, एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. गुरुवारी रात्री हा प्रकार घडला आहे.

विनायक जालिंदर बंडगर (वय २३,रा. रायकर मळा, धायरी, ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सिहंगड रोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायकला दारूचे व्यसन होते. त्याचे आई वडील हे किराणा मालाचे दुकान चालवत असून गुरुवारी सायंकाळी तो मित्रांबरोबर बाहेर गेला होता. रात्री आठच्या सुमारास तो परत घरी आला त्यावेळी आई वडील दुकानात होते. रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास त्याची आई घरी गेली. त्यावेळी त्यांनी बाहेरून दरवाजा ठोठावला. मात्र आतून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने शेजारील नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता त्याने पंख्याला कपड्याच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. अज्ञात कारणावरून त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास पोलिस हवालदार अशोक कदम करीत आहे.