Pune : तरुणाचा निर्घृण खून, चेहरा विद्रुप करुन कापले गुप्तांग

देहूरोड : पोलीसनामा ऑनलाइन – देहूजवळील शिवनगरी परिसरात इंद्रायणी नदीपात्रातील ड्रेनेज लाईन लगत एका अनोळखी तरुणाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला होता. हा प्रकार 28 फेब्रुवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आला होता. या तरुणाच्या शरीरावर अनेक जखमा असून पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा अज्ञात व्यक्ती विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूगाव जवळील शिवनगरीजवळ इंद्रायणी नदी पात्रात सांडपाणी वाहिनीजवळ एका 25 ते 30 वर्षाच्या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. तरुणाचा मृतदेह विवस्त्रवस्थेत आढळून आला होता. त्याच्या चेहऱ्यावर आणि संपूर्ण शरीरावर ठिकठिकाणी जखमा असून धारदार शस्त्राने त्याचे गुप्तांग कापण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तरुणाची ओळख पटू नये यासाठी त्याचा चेहरा विद्रुप करण्यात आला असून त्याला विवस्त्र अवस्थेत टाकून देण्यात आले असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

देहूरोड पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मयत म्हणून नोंद केली होती. सोमवारी रात्री उशीरा अज्ञात व्यक्ती विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक किरण सदाशीव कणसे यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गज्जेवार करीत आहे.