Pune News : पुणेकराचा पराक्रम ! वैष्णोदेवी ते कन्याकुमारी प्रवास सायकलवर केला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या एका व्यक्तीनं पुणे ते वैष्णोदेवी असा 2500 किमीची प्रवास सायकलवरून केला आहे. पुण्याच्या शिंदेवाडीत राहणाऱ्या या व्यक्तीचं नाव महेश गोगावले आहे.

महेश पुण्यातील शिंदेवाडी भागात राहतात. आई वडिल, भाऊ, पत्नी, मुलगी आणि मुलगा असं त्यांचं एकत्र कुटुंब आहे. रागाच्या भरात त्यांनी 2015 मध्ये सुरू केलेला सायकल प्रवास अखंड सुरू असून त्यांनी आजतागायत 9700 किमीचा प्रवास सायकलवरून पूर्ण केला आहे. नुकताच त्यांनी पुणे ते वैष्णोदेवी असा प्रवास सायकलवरून केला आहे. वैष्णोदेवीचं दर्शन घेऊन ते परत आले आहेत.

आपला अनुभव सांगताना महेश गोगोवले म्हणतात, प्रवास करताना अनेक चांगले आणि वाईट अनुभव आले. चार वेळा सायकल पंक्चर झाली. दिवसाला 120 किमीचं टारगेट होतं परंतु वातावरणातील बदलामुळं रोज 80 किमीचा प्रवास झाला. यामुळं प्रवासाला लागणारा कालावधी वाढला. उत्तरेकडील भागात या दिवसात प्रचंड थंडी असते. परिस्थितीला शरण न जाता प्रवास चालू ठेवला. पुण्यातून लोणावळा, पनवेल, पालघर, सुरत, बडोदा, अहमदाबाद, गांधीनगर, उदयपूर, जयपूर, हरियाणा, दिल्ली, सोनीपत, पानीपत, अमृतसर, अंबाला, जालिंदर, पठाणकोट, जम्मू काश्मीर सिटी आणि अखेर कटरा वैष्णोदेवी असा एकूण 2500 किमीचा प्रवास हा साकलवरून एका महिन्यात पूर्ण केला.

महेश यांच्या कामगिरीची दखल घेत वंदेमातरम संघटना, कौशल्य विकास प्रतिष्ठान आणि येवले फाऊंडेशन यांच्या वतीनं सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नवनाथ येवले, वंदेमातरम संघटनेचे प्रशांत नरवडे, स्वीकृत नगरसेवक तुषार कदम, संतोष देवकर, मंगेश जाधव, निलेश येवले, सागर म्हस्के, अमोल कोकरे आदी उपस्थित होते.