पुणेकरांनी एका गव्यास मारून दाखवलं, अन्…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  “एका गव्यास पुणेकरांनी मारुन दाखवले. पुणेकरांनी हे सुद्धा करुन दाखवले. चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघात हे घडले. भाजपवाले आता असा आरोप करतील की, हे नक्कीच महाविकास आघाडीचे अपयश आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणतील, गव्यास मारले ते पाकिस्तान-चीनच्या चिथावणीमुळेच. पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत काही मानवी गव्यांना लोकांनी वेसण घातली. त्याचा राग रानगव्यास मारुन कोणी काढला काय? पुणे तिथे काय उणे,” असे म्हणत शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे.

बुधवारी वाट चुकून पुण्यात घुसलेल्या एका रानगव्याला आधी जेरबंद करण्यात आले. मात्र, काही तासातच त्याचा मृत्यू झाला. याबाबत विविध स्तरातून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. प्राणीप्रेमींनीही याबद्दल संताप व्यक्त केला. शिवसेनेनेही ‘सामाना’च्या अग्रलेखातून पुणेकारांच्या कृत्याचा समाचार घेण्यात आला.

पुणे व आसपासच्या परिसरात अधूनमधून हिसंक, अमानुष घटना घडत असतात. मनुष्य आहे तेथे रावण आहेच, पण रावणातही किमान माणुसकी होती. अशोकवनात सूक्ष्म रूपाने घुसलेल्या हनुमानच्या शेपटीला त्याने फक्त आग लावली, निर्घृणपणे ठार केले नाही, पण आपले पुणेकर दोन पावले पुढेच आहेत. शौर्य दाखविण्यात धुंदीत ते इतके निर्घृण झाले की, चुकून शहरात शिरलेल्या एका रानगव्यास हाल हाल करुन मारले आहे. जंगलातील प्राणी मनुष्यवस्त्यांत घुसतात याचे मुख्य कारण मनुष्याने जंगलावर अतिक्रमण केले आहे. असा एक गवा पुणे परिसरात घुसला व मनुष्याच्या क्रौर्यामुळे मृत्युमुखी पडला.

आम्ही वाघ वाचवतो, साप वाचवतो. बिबटे, हत्ती वाचवतो, पण एका गव्यास निर्घृणपणे मारतो. वाघ हा गव्याची शिकार करु शकतो. कळपात असेल तर गवाही वाघाला शिंगावर घेऊन आपटतो, पण पुण्यातील हे लोक वाघापेक्षाही शूर झालेले दिसतात. त्यांनी एकट्यादुकट्या गव्यास ठार केले आहे. कोविड-१९ व टाळेबंदी काळात जास्तच आराम फर्मावल्यामुळे पुणेकरांत हे जे हत्तीचे बळ संचारले आहे, त्याची दखल सरकारने वेळीच घ्यावी, असे म्हणत रानगव्यांच्या संरक्षणासाठी संपादक संजय राऊत यांनी सरकारला सुचवले आहे.

… मग रानगव्यास जगण्याचा अधिकार नाही काय?

जंगलातील चारापाणी संपले असावे. त्या भटकंतीत गवा पुण्यात शिरला तर त्याला मारण्यात आले. आमच्या जंगल खात्याच्या कर्मचाऱ्यांना असे प्रसंग हाताळण्याचे नीट प्रशिक्षण आहे काय? पर्यावरण, वन्य प्राण्यांच्या रक्षणाबाबत सरकार जागरूक आहे. आरे जंगल, जंगलातील प्राणी वगैरे वाचवण्यासाठी सरकारने मेट्रो कारशेडची जागाच बदलली, वाघ बचाव आंदोलनात सरकार झोकून देते, मग मग रानगव्यास जगण्याचा अधिकार नाही काय?, असा सवालही सामानातून उपस्थित करण्यात आला.