पुण्याच्या तोंडचे पाणी पळविले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पाटबंधारे विभाग आणि महापालिकेच्या वादाने गंभीररूप धारण केले आहे. कालव्याच्या जागेचा कर भरावा अशी नोटिस पालिकेने पाठविल्यानंतर पाटबंधारे विभागाने आज दुपारी पालिकेचा पाणी पुरावठाच बंद केला. राज्यात आणि पालिकेत भाजपची सत्ता असताना दोन विभागात समन्वय नसल्याने’ पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

पाटबंधारे विभागाचे आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पर्वती जलकेंद्राकडे जाणाऱ्या 250 एमएलडी पाईप लाईनची मोटर बंद केली. पाटबंधारे विभागाने पालकमंत्री गिरीश बापट यांनी मागील आठवड्यात महापालिकेत झालेल्या बैठकीत पुण्याच्या पाण्यात कपात करू नका. पुढील काळात याबाबत निर्णय घेऊ असे आदेश देऊनही आज पाटबंधारे विभागाने पाणी बंद केल्याने सत्ताधारी भाजपचा प्रशासनावर वचक राहिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, या वादामागे पालिकेच्या कर संकलन विभागाने पुणे शहरातून जाणाऱ्या 30 किमी कालव्याच्या जागेचा 60 कोटी रुपये मिळकतकर भरावा अशी नोटीस पाटबंधारे विभागाला पाठवली आहे. यामुळे पाटबंधारे विभागामधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. याचीच परिणीती आज पालिकेच्या 250 एमएलडी पाण्यात कपात करून त्याला प्रत्युत्तर देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान पाटबंधारे विभागाने मागील तीन महिन्यात तिसऱ्यांदा अचानक पणे पाणी बंद केल्याने पालिकेतील भाजपचे पदाधिकारी ही संतप्त झाले आहेत. महापौर मुक्ता टिळक यांनी याप्रकरणी जलसंपदा मंत्री यांच्याशी संपर्क साधून पाणी पुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी केली आहे. तसेच उद्या सकाळी पाटबंधारे विभागात जाऊन अधिकाऱ्यांना याचा जाब विचारण्यात येईल. आज रात्री पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यलयात फिरकू देणार नाही, असा इशाराही टिळक यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.