पैशांच्या तगाद्यामुळे पुण्यातील वकीलाची आत्महत्या ; पोलिसांकडून एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पैशांच्या तगाद्याला कंटाळून कार्यालयात आत्महत्या केलेल्या वकील अ‍ॅड. युवराज ननावरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्या मित्राला सहकार नगर पोलिसांनी अटक केली आहे. अ‍ॅड. ननावरे यांनी ३ एप्रिल रोजी धनकवडी येथील कार्यलायत आत्महत्या केली होती.

अभय रामचंद्र कुलकर्णी (रा. गुरुराज सोसायटी, पद्मावती, पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी रत्नप्रभा युवराज ननावरे (वय ४९) यांनी फिर्याद दिली आहे.

युवराज ननावरे हे धनकवडी परिसरात रहावयास होते. त्यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजु शकलेले नाही. ननावरे हे गेल्या 25 वर्षापासुन शिवाजीनगर येथील न्यायालयात सिव्हील प्रॅक्टीस करीत होते. त्यांची जीपीएस नावाची प्रॉपर्टी इन्वेस्टमेंट कंपनी आहे. त्यांनी २०१६ मध्ये त्यांनी अभय कुलकर्णी यांच्याकडून ६७ लाख रुपये घेतले होते. त्यांनी त्याच्या व्याजापोटी ५६ लाख रुपये देखील परत केले. तरीही कुलकर्णी यांनी त्यांना मानसिक त्रास दिला. असे फिर्यादीत म्हटले आहे. सहकार नगर पोलिसांनी चौकशी करून याप्रकरणी अभय कुलकर्णी यांना अटक केली आहे.