बलात्कारीला २४ तासात शिक्षा ; मध्य प्रदेश मधील कोर्टाचा सुपर फास्ट निकाल 

उज्जैन : वृत्तसंस्था
देशात ज्या प्रकारे  बलात्काराच्या घटना समोर येत आहेत . हे पाहता बलात्कारासारख्या आरोपांमध्ये आरोपीला तातडीने शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून  केली जात आहे . असे असताना मध्य प्रदेश  येथील एका कोर्टाने बलात्काराचा खटला फास्टट्रॅक मध्ये चालवून न्यायालयात आरोपपत्र दाखल होताच २४ तासात  शिक्षा सुनावली आहे.  या निकाला मुळे सर्वत्र या न्यायालयाचे कौतुक होत आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी स्वातंत्र्य दिनी म्हणजे १५  ऑगस्ट रोजी मुलीला शेजारच्या १४ वर्षीय मुलासोबत खेळण्यास पाठवले होते . शेजारचाच मुलगा असल्याने मुलीला त्याच्यासोबत जाऊ देऊन, कुटुंबीय कामाला गेले. मात्र त्याच दिवशी आरोपीने मुलीवर बलात्कार केला.
उज्जैनचे पोलीस अधीक्षक सचिन अतुलकर यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, बलात्कारानंतर आरोपी गाव सोडून पळून गेला होता. मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ ऑगस्टला त्याला एका नातेवाईकाच्या घरातून पकडले  होते .
पोलिसांनी तातडीने तपास केला. चार दिवसांच्या आत पोलिसांनी तपास पूर्ण करत, सोमवारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायाधीश तृप्ती पांडे यांनी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर काही तासातच निर्णय दिला. दोषी अल्पवयीन आरोपीची दोन वर्षांसाठी बालसुधारगृहात रवानगी केली.