‘सिद्धूंनी पटियाळातून निवडणूक लढवावी’, CM अमरिंदर सिंगांचे आव्हान

चंदीगड : वृत्तसंस्था – पंजाबमध्ये काँग्रेसमध्ये वादाला तोंड फुटलं आहे. एकेकाळी जवळ असलेले मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात दरी निर्माण झाली आहे. दोन्ही नेते एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मागील काही दिवसांपासून सिद्धू यांनी मुख्यमंत्री अमरिंदर यांच्यावर टीका करत आहेत. सिद्धू यांच्या टीकेला मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी उत्तर दिले आहे. अमृतसरचे आमदार असलेल्या सिद्धूंनी पटियाळातून माझ्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवावी, त्यांचे डिपॉझिट जप्त होईल, असे आव्हान अमरिंदर सिंग यांनी दिले आहे.

अमरिंदर सिंग म्हणाले, ते रोज काही तरी बोलत असतात. त्यांनी वक्तव्य केले नाही असा एकही दिवस जात नाही. माझ्यावर टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताच अजेंडा नाही. ते कोणत्या पक्षात आहेत हेच त्यांना माहिती नाही. जर ते काँग्रेसमध्ये असतील तर ते शिस्तभंग करत आहेत. त्यांना या प्रकारचे वक्तव्य करण्याची गरज काय ? ते बहुधा आम आदमी पक्षामध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण भाजप त्यांना पुन्हा परत घेणार नाही. अकाली दलाबाबतही तीच परिस्थिती आहे. ते कुठं जातील ? एकतर आमच्या पक्षात राहतील किंवा बाहेर पडतील, अशी टीका त्यांनी केली. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

सिद्धूचे डिपॉझिट जप्त होईल
सिद्धू आणि त्यांच्या पत्नी नवजोत कौर हे अमरिंदर सिंह यांच्या पटियाळा मतदारसंघात प्रचार करण्यासाठी येणार का ? असा प्रश्न अमरिंदर यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी सिद्धू यांना आव्हान दिले. सिद्धू यांचं पटियाळामध्ये स्वागत आहे. त्यांना पटियाळामध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवता येणार नाही. मागच्यावेळी जनरल जेजे सिंग निवडणुकीला उभे होते. त्यांचे डिपॉझिट जप्त झालं. सिद्धूंचीही अवस्था तीच होईल, असा दावा त्यांनी केला.

हम तो डुबेंगे सनम…
दरम्यान, सिद्धू यांनी सोशल मीडिया अकाउंटवरुन काँग्रेसचं नाव हटवलं आहे. यासोबतच मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरोधात वक्तव्य केले आहे. कोटकपुरा आणि बहिबल कलां गोळीबार प्रकरणी एसआयटी चौकशी रद्द केल्याने कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे नाव न घेता त्यांच्यावरही टीका केली. हम तो डुबेंगे सनम, तुम्हे भी ले डुबेंगे, असं सिद्धूंनी सोशल मीडियावर लिहिलं. हे सरकार आणि पक्षाचे अपयश आहे. पण एका व्यक्तीने दोषींसोबत हातमिळवणी केली आहे, असंही सिद्धू म्हणाले.