बस चालवताना ‘टिकटॉक’ व्हिडिओ शूट करणारा चालक निलंबित !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टिकटॉकने संपूर्ण तरुणाईला वेड लावले आहे. कोणतेही व्हिडीओ बनवून ते टिकटॉकवर टाकणे आजकालच्या तरुणाईचे नियमित काम झाले आहे. मात्र टिकटॉकवर व्हिडीओ बनवत असताना स्वतः च्या जीवाची काळजी देखील हे तरुण घेताना दिसत नाहीत. टिकटॉकवर व्हिडीओ बनवताना अनेक जणांचा अपघाती मृत्यू झाल्याचे आपण अनेक वेळा ऐकले आहे. मात्र यातून लोक काहीच धडा घेत नाहीत. असाच एक प्रकार पंजाबमध्ये समोर आला आहे. टिकटॉक या सोशल मिडीयावरील ऍपवर व्हिडीओ शूट करणाऱ्या बस चालकाला निलंबित करण्यात आले आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पंजाब रोडवेजने त्याच्याविरोधात हि कारवाई केली आहे.

अमनजोत ब्रार असे या बस चालकाचे नाव असून त्याने सात जुलै रोजी बस चालवताना हा व्हिडीओ शूट केला होता. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर तात्काळ कंपनीच्या महाव्यवस्थापकांनी कारवाई करत त्याला निलंबित केले. चालकांना अशा प्रकारे गाडी चालवताना मोबाईल वापरणे किंवा व्हिडीओ शूट करण्यास बंदी असताना देखील त्याने हे कृत्य केल्याने त्याला निलंबित केल्यानंतर विभागस्तरीय चौकशी समिती स्थापन करून त्याविरोधात चौकशी केली जाणार आहे. याप्रकारे बस चालवताना फोनवर बोलणे किंवा व्हिडीओ शूट करणे फार महागात पडू शकते. शेकडो प्रवाशांच्या जीवाशी अशाप्रकारे खेळण्याचा अधिकार या चालकांना कुणी दिला, असा प्रश्न लोक विचारत आहेत.

दरम्यान, अशा प्रकारच्या घटनांकडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याचे पंजाब रोडवेजचे महाव्यवस्थापक परमीत सिंह मिनहास यांनी सांगितले. त्याचबरोबर इतर कर्मचाऱ्यांना देखील यासंदर्भात सक्त ताकीद दिली असल्याचे त्यांनी सांगितले.