कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मोफत शिक्षण, ‘या’ सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाने देशात थैमान घातले आहे. अनेक मुलांच्या आई-वडीलांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी अनाथ झालेल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करण्याची जबाबदार उचलली आहे. केजरीवाल सरकारने नुकतेच कोरोनाग्रस्तांसाठी अनेक योजनांची घोषणा केली. यामध्ये त्यांनी ज्या लहान मुलांच्या आई-वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे अशा मुलांच्या शिक्षणाचा खर्च दिल्ली सरकार करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता पंजाब सरकारने अशाप्रकारची घोषणा केली आहे.

पंजाब सरकारने देखील कोरोनामुळे अनाथ झालेल्या किंवा घरातील कमावत्या सदस्याचे निधन झालेल्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. या मुलांना सरकारकडून पदवीपर्यंत मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. अभ्यासाचा सर्व खर्च सरकार करणार आहे. तसेच मुलांना समाजिक सुरक्षा पेन्शन म्हणून दरमहा दीड हजार रुपये देण्यात येतील अशी घोषणा पंजाब सरकारने केली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, पांजाबमध्ये ज्या मुलांनी आपल्या आई-वडिलांना तसेच घरातील कमावत्या सदस्याला गमावले आहे. त्या सर्वांना समाजिक सुरक्षा पेन्शन योजनेअंतर्गत पदवीपर्यंत नि:शुल्क शिक्षण दिले जाईल. असे करणे हे राज्याचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.

यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, 21 वर्षे वयोगटातील पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मदत उपाय उपलब्ध करुन देण्यात येतील. यापूर्वी शालेय व महाविद्यालयीन शिक्षण विद्यार्थ्यांसाठी मोफत असेल.