पंजाबमध्ये ६-७ दहशतवाद्याचा शिरकाव ; सुरक्षेला मोठे आवाहन

फिरोजपूर : पंजाब वृत्तसंस्था-फिरोजपूर येथील भारत पाकिस्तानच्या सीमेवरून जैश-ए-मोहमद चे ६ ते ७ दहशतवादी घुसले आहेत. फिरोजपूर आणि सबंध पंजाब राज्याला हायअलर्ट  लागू केला असून पंजाब सरकारने राज्याच्या पोलीस खात्याला दहशतवाद्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.  दहशतवादी घुसल्याची बातमी पंजाबच्या गुप्तवार्ता विभागाने दिली असून फिरोजपूरच्या आसपास दहशतवादी लपून बसले असल्याचा संभव त्यांनी व्यक्त केला आहे.

देशाची राजधानी दिल्ली या ठिकाणी मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट असून त्यासाठी पठाणकोट भागातील  माधोपुर येथून त्यांनी कार चोरली आहे. त्यांना दिल्लीत प्रवेश मिळाला नाही तर ते पंजाबमधील काेणत्याही शहरावर हल्ला करतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. फिरोजपूरसह अन्य ठिकाणीही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून दिल्लीच्या दिशेने  जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सर्वत्र पोलीसांना सतर्क करण्यात आल्याने तसेच दहशतवाद्यांच्या हल्ल्याची बातमी सर्वत्र पसरल्याने पंजाबमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांवर होणार हल्ला 
पोलिसांच्या गुप्त वार्ता विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी संघाच्या शाखांना टार्गेट करून  दहशतवादी हल्ले करणार आहेत अशी बातमी सोमोर येते आहे. संघाच्या हिंदूंत्ववादाची चीड मनात धरून हा हल्ला घडवला जाण्याची शक्यता आहे तसेच इतर पक्षांच्या कार्यालयांवर हि हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे राजकीय पक्षांच्या कार्यालयाला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख नेत्यांना हि पोलीस संरक्षण देण्यात  आले आहे.

दहशतवाद्यांनी रचलेल्या कटानुसार  दिल्लीवर जर हल्ला झाला तर तो सुरक्षा व्यवस्थेवर मोठा डाग मानण्यात येणार आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात सुरक्षा यंत्रणा अत्यंत सतर्क झाले आहेत.