पंजाब : सुखबीर बादल यांच्या गाडीवर हल्ला; राऊंड फायरिंगही केले

अमृतसर : पोलीसनामा ऑनलाइन  –  पंजाबच्या जलालाबाद येथे अकाली दलाचे नेते सुखबीर बादल यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. हा हल्ला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोपा अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि अकाली दलाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यादरम्यान विटा-दगड फेकून हाणामारी झाली. तसेच अनेक राऊंड फायरिंग झाल्याचेही वृत्त आहे.

जलालाबाद येथे नगर परिषदेची निवडणूक होत आहे. त्याचदरम्यान ही घटना घडली. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यानंतर आज अकाली दलाच्या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरण्यासाठी स्वत: अकाली दलाचे प्रमुख सुखबीर बादल पोहोचले होते. जेव्हा सुखबीर बादल यांचा ताफा जलालाबाद कोर्ट कॉम्प्लेक्स येथे पोहोचला तेव्हा लगेचच धिंगाणा सुरु झाला. सगळीकडे चेंगराचेंगरी झाली. लोक बॅरिकेड्स तोडून कोर्ट कॉम्प्लेक्समध्ये दाखल होत होते. त्याचवेळी जोरदार दगडफेक झाली.

तसेच राऊंड फायरिंगही झाली. इतकेच नाही तर त्या ठिकाणी उपस्थित सुखबीर बादल यांच्या गाडीवर मोठी दगडफेक झाली. जेव्हा या ठिकाणी दगडफेक झाली तेव्हा ते गाडीत नव्हते. त्यांना कडक सुरक्षेत दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले.

अकाली दलाचे कार्यकर्ते जखमी

काँग्रेस आणि अकाली दलाचे कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीत अकाली दलाचे दोन कार्यकर्ते जखमी झाले आहेत. दरम्यान, हा हल्ला काँग्रेसच्या गुंडांकडून केला गेला, असा आरोप अकाली दलाकडून करण्यात आला.