शेतकरी आंदोलनाचा भाजपला मोठा फटका ! खासदार सनी देओल यांच्या मतदारसंघातील सर्व जागांवर पराभव

चंदीगड : पोलीसनामा ऑनलाईन –  पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठया पराभवाचा सामना करावा लागला आहे. कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा चांगलाच फटका या निवडणूकीत भाजपला बसल्याचे दिसत आहे. निवडणूकीत काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल या पक्षांनी जोरदार मुसंडी मारली आहे. भाजप खासदार सनी देओल यांच्या लोकसभा मतदारसंघातील सर्व 29 जागांवर भाजपचा पराभव झाला असून या जागांवर काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

पंजाबमधील निवडणुकांत आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये काँग्रेस पहिल्या क्रमांकावर असून, शिरोमणी अकाली दल दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजपाची मोठी घसरण झाल्याचे असून, आम आदमी पक्षानेही काही ठिकाणी विजय मिळवल्याचे समजते. अकाली दलासोबतची युती तुटल्यानंतर प्रथमच एकट्याने निवडणूक लढवणाऱ्या भाजपला अनेक ठिकाणी पराभव पत्करावा लागला आहे. मजिठामध्ये 13 पैकी 10 जागांवर अकाली दलाने, तरणतारणमधील भिखिविंड नगरपंचायतीमध्ये काँग्रेसने 11 तर अकाली दलाने 2 जागांवर विजय मिळवला आहे. राजकोटमधील सर्व 15 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. जलालाबादमध्ये 17 पैकी 9 जागांवर काँग्रेसने विजयाचा झेंडा फडकावला आहे. नंगल, लोहियाँ आणि नूरमहल येथेही काँग्रेसने विजय मिळवला आहे. राजपूरामध्ये 27 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला असून मोगामध्येही काँग्रेस मोठा पक्ष ठरला आहे.