दहशतवाद्यांच्या चकमकीत जवान बलजीत सिंग शहीद

कर्नाल : वृत्तसंस्था – जम्मू -काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यामध्ये भारतीय जवान बलजीत सिंग (वय ३५) शहीद झाले आहेत. बलजीत सिंग यांच्या पार्थिवावर बुधवारी मूळगाव डिंगर माजरा येथे लष्करी इतमामात अंत्यदर्शन करण्यात आले. ‘भारत माता की जय’ या जयघोषात ग्रामस्थांनी आपल्या वीरपुत्राला अखेरचा निरोप दिला. शहीद जवान बलजीत सिंग यांचा अवघ्या तीन वर्षांचा मुलगा अर्णवनं त्यांना मुखाग्नी दिला. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या क्षणाच्या वेळेस संपूर्ण गाव हळहळले.

शहीद जवान बलजीत सिंग 50 राष्ट्रीय रायफलमध्ये हवालदार पदावर कार्यरत होते. लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी उशिरा रात्री 2.30 वाजता रत्नीपुरा परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली. यानंतर जवानांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली. परिसरातील एका घरात आणि शाळेमध्ये दहशतवादी लपून बसले होते. दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. या भ्याड हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत बलजीत सिंग यांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. पण चकमकीदरम्यान सिंग गंभीर जखमी झाले. यानंतर सिंग यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मेजर जनरल यांच्या नेतृत्वाखालील लष्करी तुकडी आणि जिल्हा पोलिसांच्या पथकाने बलजीत सिंग याना सलामी दिली. यावेळेस ‘भारत माता की जय, शहीद बलजीत सिंग अमर रहे’, या जयघोषांसहीत यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.