वडिलधार्‍यांचं ऐकावं म्हणतात ते उगीच नव्हे ! सासऱ्यांच्या सांगण्यावरुन तिकीट खरेदी केलेल्या सूनेला लागली अडीच कोटीची लॉटरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सास-ऱ्याच्या सांगण्यावरून लॉटरीचे तिकीट विकत घेतलेल्या पश्चिम बंगालमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील संगीता चौबे या महिलेला तब्बल अडीच कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. लॉटरी लागल्यामुळे तिच्या कुटुंबियांचा आनंद गगनात मानेनासा झाला आहे.

पंजाबमध्ये नववर्षानिमित्त घेतलेल्या लोहरी बंपर 2021 लॉट्ररीचे निकाल जाहीर झाले आहेत. पंजाब राज्य सरकारच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या लॉटरीचे तिकीट संगीता चौबे यांनी सास-याच्या सांगण्यावरून खरेदी केले होते. त्यांनी घेतलेल्या तिकाटालाच तब्बल अडीच कोटींची लॉटरी लागली आहे. मी एवढी मोठी रक्कम लॉट्ररीमध्ये जिंकेल असे कधी स्वप्नातही वाटल नव्हत, असे सांगत आपला आनंद व्यक्त केला आहे.

48 वर्षीय संगीता लहान मुलांचे मॉडलिंग आणि चित्रकलेचे क्लास घेतात. संगीता म्हणाल्या माझे सासरे गेल्या अनेक वर्षापासून लॉट्ररीचं तिकीट खरेदी करत होते. पण त्यांना कधी एवढं मोठं बक्षीस मिळाले नाही. एकदा त्यांनी मलाच लॉट्ररीच तिकीट काढायला सांगितले. मी ही त्यांचे ऐकून लॉट्ररीच तिकीट काढले आणि मला खरोखरच पहिल्या क्रमांकाच बक्षीस मिळाल. यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही, असे त्या म्हणाल्या.

पुरस्काराची रक्कम मिळवण्यासाठी आज पंजाब सरकारच्या लॉट्ररी विभागाकडे आवश्यक कागदपत्र आणि तिकीट जमा केल्यानंतर संगीता यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी संगीता यांनी त्यांचे पती एका खासगी कंपनीमध्ये काम करतात अशी माहिती दिली. तसेच त्यांना एक मुलगी आणि दोन मुल आहेत. या पैशांमधून आपण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी गुंकतवणूक करणार असल्याचंही संगीता यावेळी म्हणाल्या. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे मिळाल्याने आमच्या अनेक आर्थिक अडचणी सुटतील असंही संगीता यांनी म्हटले आहे.