पंजाबी गायकाचा ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू, कुटुंबियांनी दंडातून काढलं इंजेक्शन

नवी दिल्ली,वृत्तसंस्था : बरनाला येथील महल कला गावात राहणारा गायक गगनदीप सिंहचा चिट्टाच्या (ड्रग) ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गायक गगनदीप सिंह हा आपल्या पालकांचा एकुलता एक मुलगा होता. रविवारी संध्याकाळी 26 वर्षीय गगनदीप सिंह जेव्हा घरी आला, तेव्हा त्याची प्रकृती ठीक नव्हती. घरी आल्यानंतर तो बेशुद्ध झाला, परंतु रात्री उशीरा त्याचा मृत्यू झाला.

गायक गगनदीपच्या मृत्यूच्या वेळी, त्याच्या हाताला इंजेक्शन होते, जे घरातील लोकांनी काढले. प्रसिद्ध गायक गुरलेज अख्तर यांच्याबरोबर त्याने गायलेली ‘जीजा जी’ आणि ‘ चक्कवीं मंडीर ‘ ही गाणी यूट्यूबवर चांगलीच गाजली. त्याने आतापर्यंत एक कोटी रुपयांहून अधिकचा चिट्टा घेतल्याचे मृताच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्याचवेळी मृताच्या वडिलांनी आरोप केला की, महल कलामध्ये खुलेआम चिट्टा विकला जात आहे आणि पोलिस तस्करांवर कारवाई करीत नाहीत.