सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचेच नाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात आले आहे, हा निर्णय मंगळवारी मुंबईत झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत केली. त्यामुळे विद्यापीठाला ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांचे नाव देण्याचा विषय आता मागे पडला आहे.

सोलापूर विद्यापीठाला ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी शिवा विरशैव संघटनेने आक्रमक आंदोलन करून महाराष्ट्र ढवळून काढला होता. तर धनगर समाजाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी मोर्चे, धरणे आंदोलनासह उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या अंगावर भंडारा उधळून, निषेधाची निवेदने भिरकवून आंदोलन तीव्र केले होते.

शिवा आणि धनगर समाजबांधवांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलने करून नामांतरप्रश्नी सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, दीड वर्षांपूर्वी नागपूर येथील धनगर समाजाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर धनगर समाज बांधवांनी सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांच्या नामकरणाचा विषय छेडला असता मुख्यमंत्र्यांनी सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देणार असल्याची घोषणा केली होती.

घोषणा होऊन जवळपास दीड वर्षानंतर म्हणजेच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी शनिवारी मंत्री उपसमितीच्या बैठकीत पाच मार्च रोजी सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाईंचे नाव देण्याची घोषणा करून धनगर समाजाला आपलेसे करण्याचा प्रयत्न केला.