विधानसभेसाठी पुरंदरचे प्रशासन सज्ज

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – विधानसभेच्या निवडणुका २१ ऑक्टोबरला होत असून, २०२ पुरंदर – हवेली विधानसभा मतदारसंघांतर्गत मतदान प्रक्रियेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आरती भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी पुरंदरच्या तहसीलदार व सहायक निवडणूक अधिकारी रूपाली सरनोबत उपस्थित होत्या. आचारसंहितेच्या नियमांची काटेकोर अंमलबाजवणी करणार असल्याचे वेळी भोसले यांनी सांगितले.

या मतदारसंघात एकूण ३८० मतदान केंद्रे तर ३ लाख ५९ हजार ८३९ मतदार आहेत. यात १ लाख ८८ हजार ५०९ पुरुष, १ लाख ७१ हजार ३०३ महिला तर २७ इतर मतदारांचा समावेश आहे. मतदानासाठी २६०० राखीवसह कर्मचारी नेमण्यात आले आहेत. एकूण ३८ झोन असून, सर्वत्र झोनल ऑफिसर्स असणार आहेत. पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील सर्व २६ मतदान केंद्रे या वेळी तळमजल्यावर घेण्यात आली आहेत. मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रे पक्क्या इमारतीत आहेत. जवळपास १२०० दिव्यांग मतदार असून दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर आणि मदतीसाठी व्यवस्था ठेवण्यात येणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.

लोकसभेप्रमाणे या वेळीही सखी मतदान केंद्र सासवडच्या वीर बाजी पासलकर विद्यालयात उभारण्यात येणार असून, या ठिकाणी झोनल अधिकारी, मतदान अधिकारी ते शिपायापर्यंत सर्व कामकाज महिला पाहणार असल्याचेही आरती भोसले यांनी सांगितले.

सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनाही आचारसंहितेबाबत सूचना दिल्या असून, उमेदवारी अर्ज भरण्याचे प्रात्यक्षिक दिले आहे. उमेदवारी अर्ज २७ पासून भरण्यास सुरुवात होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारासह फक्त ५ जणांना आत प्रवेश देण्यात येणार आहे. मतदारसंघातील पाच मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित केली आहेत. २८ रोजी सासवडच्या आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण होणार आहे. तर दिवे येथील शासकीय गोदाम आणि आयटीआय येथे स्ट्राँग रूम असून दिवे आयटीआय येथेच २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Visit : policenama.com