पुरंदर – हवेली येथील प्रशासकीय यंत्रणा ‘सज्ज’ !

जेजुरी :पोलीसनामा ऑनलाइन – पुरंदर – हवेली विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातून एकूण ३, ६१, ४८० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष मतदार हे १, ८९, ३८१ व महिला मतदार १, ७२, ०८३ तर इतर १६ मतदार आहेत. यासाठी पुरंदर – हवेली येथील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी आरती भोसले यांनी सांगितले.

दरम्यान, यामध्ये १३०३ दिव्यांग मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १७९ व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. १९२ अतितीव्र दिव्यांग आहेत. सैनिकी मतदार हे ६७० आहेत. निवडणुकीसाठी ३८० मतदान केंद्र असून, ३८ झोनल ऑफिसर असणार आहेत. ६ भरारी पथके, ६ स्थिर पथके नेमलेले आहेत. १ मतदान जागृती, १ आचारसंहिता अशी पथके नेमली आहेत. यामध्ये पोस्टल बॅलेट १९४६ पाठवलेले आहेत .

दिवे, गराडे, भिवरी, परिंचे, सासवड, पुरंदर हायस्कूल हे संवेदनशील मतदान केंद्र आहेत. तर आंबेगाव येथील मतदान केंद्र क्रमांक ६ , जेजुरी येथील मतदान केंद्र क्रमांक २७४ , निरा येथील मतदान केंद्र क्रमांक ३५२ हे आदर्श मतदान केंद्र आहेत. दर सोमवारी सासवड येथील आठवडे बाजार असतो. येत्या सोमवारी ( ता . २१ रोजी ) मतदान आहे. यामुळे सासवड येथील आठवडा बाजार हा बंद राहणार असल्याचे तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी सांगितले आहे.