वनपुरी येथे ग्राम प्रदक्षिणाने झाली पहाटेच्या काकड आरतीची सांगता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – 
उठा उठा प्रभात जाहली ! चिंता श्रीविठ्ठल माउली !!
दिन जणांची साउली ! येई धावुनी स्मरताची !!  तसेच,

उठा जागे व्हारे आता ! स्मरण करा पंढरीनाथा !
भावे चरणी ठेवी माथा ! चुकवी व्यथा जन्माच्या !!  त्याच प्रमाणे

करुनि विनवणी पायी ठेवितो माथा ! परिसावी विनंती माझी पंढरीनाथा !!

अशा प्रकारे वीणा वादन, आणि टाळ – मृदूंगाच्या गजर करीत, मुखाने हरिनामाचा जयघोष करून विविध प्रकारच्या अभंगांच्या भक्तिगीतांच्या तालावर पांडुरंगाचा धावा करून प्रसन्न करणाऱ्या काकडा आरतीची ग्राम प्रदक्षिणा करून मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली.

दरवर्षी कोजागिरी पौर्णिमा म्हटले कि, आपल्या डोळ्यासमोर प्रथम येते ते, चंद्राचे शीतल प्रकाश आणि आकाशात लुकलुक करणाऱ्या पांढऱ्या शुभ्र चांदण्या. या निमित्त सर्वत्र उत्साह तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र हीच कोजागिरी पौर्णिमा सांप्रदायिक क्षेत्रामध्ये पांडुरंगाची भक्ती करणाऱ्या भाविकांसाठी आणि वारकरी संप्रदायासाठी अनन्य साधारण महत्व असणारी अशी पौर्णिमा आहे. कारण हि पौर्णिमा झाली कि, लगेचच त्याच पहाटेपासून भक्तिगीतांचा कार्यक्रम सुरु होतो. तो काही एक, दोन दिवस नसतो, तर संपूर्ण महिनाभर असतो. यानिमित्त दररोज पहाटे तीन वाजताच प्रत्येक मंदिरांमध्ये भक्तिगीते सुरु होतात. सर्व भजनी मंडळे मोठ्या उत्साहात आणि आनंदाने भक्तीरसांत अक्षरशः न्हाऊन निघतात.

वनपुरी (ता. पुरंदर) येथील श्री विठ्ठल – रुख्मिणी मंदिरात या निमित्त श्री विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळाच्या वतीने काकड आरतीचे आयोजन करण्यात होते. रविवार दि. १३ ऑक्टोबर रोजी काकड आरतीला प्रारंभ करण्यात आला. यानिमित्त पहाटे नियमितपणे विठ्ठल – रुख्मिणी मूर्तींना काकडा आरती ओवाळून ग्रामस्थांच्या वतीने विधिवत अभिषेक करून महापूजा करण्यात आली. दररोज नवीन पोशाख परिधान करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात आले.

तसेच मंगळवार दि. १२ सप्टेंबर रोजी कार्तिकी पोर्णिमा निमित्त पहाटे उद्योजक संतोष कुंभारकर आणि त्यांच्या पत्नी सौ वसुंधरा कुंभारकर यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रुख्मिणी मूर्तींची सपत्नीक महापूजा करून मूर्तींना नवीन पोशाख अर्पण करण्यात आला. मंदिराचे पुजारी दामोदर रूढ यांनी सर्व विधी पार पाडले. मंदिरात यानिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भजनी मंडळाचे हभप सुदाम कुंभारकर, मृदूंगवादक संभाजी महामुनी, हार्मोनियम वादक भिमाजी कुंभारकर, महादेव कुंभारकर, तुकाराम महामुनी, देवराम जगताप त्याच प्रमाणे सुमन रूढ, संजना महामुनी, तान्हुबाई कुंभारकर, भामाबाई कुंभारकर, विमल रूढ, श्रीमती सुनंदा कुंभारकर, माजी सरपंच वर्षाताई कुंभारकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश कुंभारकर यांच्यासह गावातील ग्रामस्थ व महिला उपस्थित होते. यावेळी टाळ मृदुंगाचा गजर करीत ग्राम प्रदक्षिणा करण्यात आली.

दरम्यान तालुक्यातील सासवड येथील संत सोपानदेव मंदिर, कोडीत येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर, गराडे येथील श्री नवखंडेनाथ मंदिर, नारायणपूर येथील नारायणेश्वर मंदिर आणि श्री दत्त मंदिर, वाघापूर, सोनोरी, दिवे, चांबळी, पारगाव, राजेवाडी, आंबोडी, जेजुरी सह परिसरांतील गावे त्याच प्रमाणे केतकावळे, व इतर परिसरांतील मंदिरांमध्ये मोठ्या उत्साहात काकड आरतीची समाप्ती करण्यात आली. तर क्षेत्र पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत काकडा विसर्जित करण्यात आला.

Visit : Policenama.com