पुरंदरमध्ये मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई, ग्रामपंचायतींनी केला 58 हजाराचा दंड वसूल

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – पुरंदर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना विनाकारण फिरणाऱ्या व मास्क न वापरणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचा सपाटा ग्रामपंचायत प्रशासनाने लावला आहे. तालुक्यात आठवड्या भरात विविध ग्रमापंचायतीनी ५८ हजार रुपये दंड वसूल करून नियम मोडणाऱ्या बेदरक नागरिकांना चांगलीच आद्दल घडवली आहे. सर्वात जास्त दंड वसुली नीरा ग्रामपंचायतीने केली आहे.

पुरंदर मध्ये कोरोनाचा झपाट्याने होणारा प्रसार थांबण्यासाठी प्रशासनाच्यावतीने वेगवेगळ्या उपाय योजना केल्या जात आहेत.लॉकडाऊनचा काळात बाहेर गावहून येणाऱ्या लोकांना विलगीकरन करण्यावर ग्रामपंचायत प्रशासनाने भर दिला होता. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कोरोना खेडे गावाकडे पसरायला लागला. शासनाने सामाजिक अंतर ठेवणे, तोंडाला मास्क वापरणे असे अनेक उपाय सुचवले. लोकांनी मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचे पहायला मिळाले आणि कोरोनाचे रुग्ण वाढायला लागले. त्यामुळे या नियमांचे पालन न करणाऱ्या लोकांना दंड करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

कोरोना संदर्भाततील नियमांचे उलंघन केल्या प्रकरणी ग्रामपंचायतींनी लोकांकडून दंड वसूल करण्यास सुरवात केली. काही ग्राम पंचायतीनी केलेल्या कारवाईत तालुक्यात ५८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये जवळार्जून ५००, नाझरे- सुपे ५००, माळशिरस ५०००, शिवरी ७५००, पोंढे ६००, सोमुडी १५००, जेऊर ५००, रीसे ४००, दौंडज ५००, वागदरवाडी ५००, नीरा शिवतक्रार २४०००, केतकावळे १३०००, वाल्हे ३५००, असा एकूण ५८००० रुपायचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पुरंदरचे गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे यांनी दिली आहे. या संपूर्ण कारवाईमध्ये पोलीस प्रशासनाने ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य केले.