पुरंदरला ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) –  पुरंदर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका काल पार पडल्या. आज या ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून त्यातील दोन ग्रामपंचायती शिवसेनेने जिंकल्या, तर एका ग्रामपंचायतीत काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या संयुक्त पॅनेलला यश मिळाले. पुरंदर पंचायत समितीचे माजी सभापती अतुल म्हस्के यांच्या नावळी गावासह दवणेवाडी आणि धनकवडी या गावांचा यात समावेश होता.

नावळी ग्रामपंचायतीत यावेळी तीव्र सत्तासंघर्ष झाला. माजी सभापती अतुल म्हस्के यांची अनेक वर्षांची सत्ता उलथवण्यासाठी काॅंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप असे सर्व पक्ष याठिकाणी एकत्र आले होते. विरोधकांच्या या एकीला चांगले यश मिळताना येथे पाहायला मिळाले. सात पैकी ५ जागा या तीन पक्षांच्या युतीला मिळाल्या तर दोन जागा सेनेला मिळाल्या. सरपंचपदाच्या जागेसाठी मात्र येथे मोठा संघर्ष झाला. यात शिवसेनेच्या विठ्ठल दिनकर म्हस्के यांनी बाजी मारत विरोधी आघाडीच्या भरत छबन म्हस्के यांचा अवघ्या २ मतांनी निसटता पराभव केला.

Purandar

दवणेवाडी ग्रामपंचायतीच्या ५ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. सरपंच पदासाठी येथेही चुरशीची लढत झाली. काॅंग्रेसच्या ताब्यात असलेल्या या ग्रामपंचायतीत यंदा शिवसेनेचे शाखाप्रमुख अशोक गुलाबराव खोपडे यांनी स्वतःच दंड थोपटले होते. अशोक खोपडे यांची काॅंग्रेसच्या पल्लवी खोपडे यांच्याशी सरपंचपदासाठी सरळ लढत झाली. यात अशोक खोपडे यांनी १०३ मतांनी दणदणीत विजय संपादन करत पहिल्यांदा सेनेचा झेंडा फडकवला. गंमत म्हणजे येथे काॅंग्रेसच्या पल्लवी खोपडे यांच्यापेक्षा नोटाला जास्त मते मिळाली.

धनकवडी ग्रामपंचायत मात्र यंदा सेनेकडून हिसकावण्यात आघाडीला यश मिळाले. इथे राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसने आघाडी करून अशोक धोंडीबा जगताप यांना पुरस्कृत केले होते. त्यांनी सेनेच्या रोहित राजरत्न जगताप यांचा १२४ मतांनी पराभव केला.

एखतपूर मुंजवडी ग्रामपंचायतीत एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली. यात जवळपास १६२ इतके मतदान झाले होते. सेनेच्या ममता किरण धिवार यांनी यापैकी १५५ इतकी विक्रमी मते घेत दणदणीत विजय मिळवला.

शिवसनेच्या नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा जिल्हा परिषद सदस्य दिलीपआबा यादव, पुरंदर पंचायत समितीचे सभापती रमेश जाधव, उपसभापती दत्तात्रय काळे, माजी सभापती अतुल म्हस्के आणि हरिभाऊ लोळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Visit : Policenama.com