पुरंदरच्या आंबोडीत अर्भकाला जिवंत पुरण्याचा प्रयत्न करणारे अखेर पोलिसांच्या ताब्यात

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – पुरंदर तालुक्या तील आंबोडी येथे तीन दिवसापूर्वी एका दोन दिवसाच्या अर्भकाला जिवंत पुरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे .आज त्या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना ४ तारखे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे .

याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दि. २८ रोजी तालुक्या तील आंबोडी येथे वन विभागाच्या हद्दीलगत शेतामध्ये एका दोन दिवसाच्या अर्भकाला जिवंत पुरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पुरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन व्यक्ती आढळून आल्या होत्या. स्थानिक शेतकऱ्यांनी याबाबत विचारणा केल्यानंतर या व्यक्तींनी तेथून पोबारा केला होता. या घटनेतील आरोपींची पोलिसांना कोणतीही प्रकारची माहिती नव्हती किंवा पुरावे नव्हते. मात्र यानंतर सुद्धा सी.सी.टीव्ही फुटेज तसेच गुप्त माहितीगारा तर्फे माहिती मिळवून पोलिसांनी आज सासवड येथे राहणारे अरबाज इक्बाल बागवान व अनिकेत संपत इंगवले राहणार सासवड या दोघांना या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अरबाज बागवान याचे २१ वर्षीय तरुणी सोबत प्रेम संबंध होते. यातून या मुलाचा जन्म झाला. एका हॉस्पिटलमध्ये दोघे नवरा – बायको असल्याचे भासवून त्यांनी डिलिव्हरी करून घेतली. यानंतर हे बाळ मी सांभाळतो असे म्हणून पीडित मुलीकडून हे अर्भक अरबाज याने ताब्यात घेतले. यानंतर त्याचा मित्र अनिकेत इंगवले त्याच्याबरोबर आंबोडी येथील शेतात जाऊन हे बाळ पुरण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकऱ्यांनी पाहिल्याने हा प्रयत्न फसला. याबाबत सासवड पोलिसांमध्ये त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत .

या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने हे करीत आहेत. या घटनेने पुरंदर तालुक्या मध्ये खळबळ उडाली होती. या घटनेचा तपास तातडीने लागावा म्हणून पोलिसां समोर मोठ आवाहन होत. पोलीसांनी ४८ तासात या घटनेचा छडा लावून आरोपीला ताब्यात घेतल्यामुळे सासवड पोलिसांचे सर्व लोकांकडून कौतुक होत आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या निर्देशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने, महेश खरात, महेश उगले, भोर यांच्या टिमने ही कामगिरी केली .