कोविड सेंटरमधील रुग्णांना पुरणपोळी अन् शिरखुर्म्याचा बेत ! शिरुर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांचा कौतुकास्पद उपक्रम

शिक्रापुर : प्रतिनिधी (सचिन धुमाळ) –   साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीया सण त्याचप्रमाणे हिंदू मुस्लिम बांधवांचा ऐक्याचा असलेला सण म्हणजे रमजान ईद या सणांचे औचित्य साधून शिरूर तालुक्यातील विविध दवाखान्यात, कोविड सेटर मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार व पत्नी जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार व रावलक्ष्मी ट्रस्टच्या वतीने पुरणपोळी अन् शिरखुर्मा अशा गोड जेवणाची मेजवानी देण्यात आली.

शिरूर तालुक्यातील अनेक भागांत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाल्याने अनेक रुग्ण विविध खासगी तसेच कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत आहे.यासाठी शिरूर तालुक्यात विविध भागात विलागिकरण कक्ष उभारण्यात आली आहेत.या रुग्णांना आपलेपणाची भावना निर्माण होण्यासाठी तसेच लवकर बरे होण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले जात असून विशेषतः आहाराकडे लक्ष दिले जात आहे.

आज छत्रपती संभाजी महाराज जयंती,अक्षय तृतीया तसेच रमजान ईद हे पवित्र सण एकत्र आल्याने यानिमित्त शिरूर व हवेली तालुक्यातील चां.ता. बोरा महाविद्यालय, शिरूर,मांडवगण फराटा, उरळगाव, तळेगाव ढमढेरे, वाजेवाडी-चौफुला, कोंढापुरी, शिरूर ग्रामीण रुग्णालय, न्हावरे ग्रामीण रुग्णालय, मलठण, पाबळ, कोरेगाव मूळ, लोणी काळभोर, वाघोली, कारेगाव येथील सर्व कोविड केअर सेंटर मधील रुग्णांचा सण गोड व्हावा या दृष्टिकोनातून या सर्व कोविड केअर सेंटर मधील रुग्णांना पुरणपोळीचे जेवण व शीरखुर्माचीही मेजवानी देण्यात आली.

सर्व रुग्णांचा सण गोड व्हावा यासाठी जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांनी स्वतः लक्ष देऊन संपूर्ण नियोजन केले. मांडवगण फराटा येथील केंद्रात त्यांनी स्वतः सर्व जेवणाची तयार करत कोरोना रुग्णांसमवेत भोजन करत पुरणपोळीचा आस्वाद घेतला.