मानसिक, शारिरीक स्वास्थासाठी शुध्द आहार घ्यावा : प. पू. प्रतिभाकुंवरजी म. सा.

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

मानसिक, शारिरीक स्वास्थासाठी सर्वांनी शुध्द आहार घ्यावा. चार्तुमासात शुध्द आहार घेण्यामागे वैज्ञानिक कारण आहे. या दिवसात वातावरण थंड, दमट असते म्हणून रसयुक्त व जास्त पाणी असणारा आहार घेऊ नये. आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवणारा आहार घ्यावा. गृहिणी तन, मन, धन अर्पण करुन धर्म कार्य समजून पवित्र विचाराने प्रेरित होऊन सात्विक आहार बनवत असते. त्यामुळे या काळात सर्वांनी घरचा शुध्द आहार घ्यावा. जेवण करताना हातात मोबाईल, वर्तमान पत्र व समोर टिव्ही नसावा. सकारात्मक विचार करुन भोजन करावे. असे मार्गदर्शन प. पू. प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांनी निगडी येथे केले.

[amazon_link asins=’B0756ZJKCY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1d1a1522-93a7-11e8-9cf1-6f6c6bfca816′]

निगडी प्राधिकरणातील पाटीदार भवन येथे पवित्र चार्तुमास महिन्यानिमित्त वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने प.पू.प्रतिभाकुंवरजी आणि प.पू.प्रफुल्लाकंवरजी यांचे प्रवचन आयोजित केले आहे. यावेळी वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष नितीन बेदमुथा उद्योजक राजूशेठ सांकला, रमणलाल लुंकड, पारस मोदी, अशोक पगारिया, बाळासाहेब धोका, सुनिल नहार, मोहनलाल संचेती, सुरेखा कटारीया, आदींसह पुणे, नाशिक, जळगाव, घोडनदी परिसरातून आलेले साधक उपस्थित होते.

आज रविवारी प.पू.प्रफुल्लाकंवरजी म.सा. यांचा 78 वा उपवास (आयंबिल) होता. यावेळी प.पू.प्रतिभाकुंवरजी म.सा. मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, वीस वर्षांवरील प्रत्येक व्यक्तींने आठवड्यातून एक तरी दिवस उपवास करावा. त्यामुळे शरीरातील अनावश्यक घटक कमी होतील. मनुष्य धन कमवण्यासाठी स्वास्थ गमावतो व पुन्हा स्वास्थ मिळवण्यासाठी पुन्हा लाखोंचे धन खर्च करतो. हे टाळण्यासाठी पवित्र चार्तुमासात सर्वांनी शुध्द आहार घ्यावा असेही मार्गदर्शन प.पू.प्रतिभाकुंवरजी म.सा. यांनी केले.

निगडी प्राधिकरण येथील पाटीदार भवनमध्ये प. पू. प्रतिभाकंवरजी महाराज साहेब आणि प. पू. प्रफुल्लाजी महाराज साहेब यांचे रोज सकाळी नऊ वाजता प्रवचन होणार आहे. साधकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जैन श्रावक संघाच्या वतीने करण्यात आले आहे. प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष नितीन बेदमुथा, सुत्रसंचालन सुभाष ललवाणी आणि शारदा चोरडिया तसेच आभार मनोहरलाल लोढा यांनी मानले.