प्रेयसीचा गळा आवळून, डोक्यात दगड घालून खून

प्रियकराला पाच तासात अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पतीचे निधन झाल्यानंतर एका विवाहित तरुणाशी प्रेम संबंध जुळले. त्यानंतर लग्नाचा तगादा आणि पैश्याची मागणी यातून होत असलेल्या भांडणातून प्रियकराने प्रियशीचा गळा आवळून, डोक्यात दगड घालून खून केला. पिंपरी पोलिसानी अवघ्या पाच तासात आरोपी अटक केले.

किरण अरुण काते (२३) असे खून झालेल्या प्रेयसीचं नाव आहे. तर अक्षय उर्फ आकाश विनायक लाखे (२०) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत किरण ही विवाहित होती. तिला दोन मुले आहेत. दोन वर्षांपुर्वी तिच्या पतीचं निधन झालं आहे. अक्षय आणि किरण यांच्यात प्रेमसंबंध जुळले. अक्षयचाही विवाह झाला असून त्याला एक मूल आहे. किरण अक्षयकडे लग्नाचा तगादा लावुन पैशांची मागणी करत असे.

दोन दिवसांपूर्वी अक्षय हा नाशिक येथून आला होता. पिंपरीमध्ये बहिणीकडे आला असता किरणची भेट झाली. दोघे पिंपरी येथे जेवायला गेले. त्यानंतर दोघे हिंदुस्थान अँटिबायोटिक वसाहतीतील निर्जनस्थळी गेले, तिथे त्यांचं भांडण झालं. यावेळी किरणने अक्षयच्या कानशिलात लगावली. यामुळे चिडलेल्या अक्षयने तिचा गळा आवळला आणि तिच्या डोक्यात दगड घालून खून केला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी पोलिसांनी तपास सुरु केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, गुन्हे पोलीस निरीक्षक उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख यांच्या पथकाने आरोपीला अटक केले.