संतापजनक ! ‘लॉकडाऊन’मध्ये शाळेत थांबलेल्या महिलेवर बलात्कार, पोलिसांकडून तिघांना अटक

पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाउनचा देशभरातील कामगार आणि मजूर वर्गाला मोठा फटका बसला असून हातावर पोट असलेला मजूर वर्ग काम-धंद्यासाठी दुसर्‍या राज्यात अडकलेला आहे. लॉकडाउन काळात शाळेत आसरा मिळालेल्या 40 वर्षीय महिलेवर राजस्थानमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मागील महिन्याभरापासून संबंधित महिला जयपूर शहरात अडकून पडलेली होती. रस्त्यावर फिरत असताना स्थानिक अधिकार्‍यांनी तिची चौकशी करत तिची जवळील शाळेत राहण्याची सोय केली. त्यानंतर सवाई माधवपूर जिल्ह्यातील शाळेत 23 ते 24 एप्रिल या कालावधीत पीडित महिलेवर तिघांनी बलात्कार केला.

याप्रकरणी पोलिसांनी कमल खरवाल, लखन रायगर आणि ऋषिकेश मीना यांना अटक केली आहे. याचसोबत कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी एका पोलीस कॉन्स्टेबलचेही निलंबन केले आहे. पीडित महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात आलेली असून अहवाल येणे बाकी असल्याचे स्थानिक पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले. पीडित महिला मुलाला भेटण्यासाठी दौसा कारागृहात गेली होती. महिलेच्या मुलावर अल्पवयीन मुलीवर बलात्काचारा आरोप आहे. लॉकडाउन झाल्यानंतर जवळपास एक महिना ही महिला सवाई माधवपूरमध्ये अडकून पडली होती. मुलाला भेटून झाल्यानंतर ही महिला लॉकडाउनमध्ये अडकल्यामुळे तिच्या राहण्याची सोय जवळील शाळेत करण्यात आली. याच ठिकाणी तिच्यावर बलात्कार झाला. दरम्यान वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर महिलेची रवानगी स्थानिक क्वारंटाइन सेंटरमध्ये करण्यात आलेली आहे.