Russia vaccine Sputnik-V : ‘कोरोना’च्या लशीबाबत ‘तो’ दावा करणार्‍या रशियाच्या डॉक्टरांचा राजीनामा

पोलीसनामा ऑनलाईन टीम : जगभरात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. त्यातच रशियाने जगातील पहिली कोरोना संसर्ग विरुद्ध लस तयार केल्याचा दावा केला असला तरी या लशीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दुसरीकडे राष्ट्रीय संशोधक केंद्राचे संचालक अलेक्झांडर म्हणाले की, sputnik-v लशीचा एक डोस दोन वर्ष कोरोना संसर्गापासून बचाव करण्यास मदत करेल. रशियन सरकारी टीव्ही वहिनीला दिलेल्या मुलाखतीत गिन्टेसबर्ग यांनी सांगितलं की, लस बनवण्यासाठी संशोधन केंद्राला पाच महिन्याचा कालावधी लागला. तर ही लस फक्त फ्रंटलाईन कर्मचारी आणि इतर गरजू लोकांना देण्यात येणार असल्याचं रशियन सरकारने स्पष्ट केलं. लशीची नोंदणी करताना रशियन सरकारने सादर केलेल्या कागदपत्रांवरुन sputnik-v या लशीच्या सुरक्षेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. कागपत्रांमधून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, लस सुरक्षित आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी क्लिनिकल ट्रायल पूर्ण झालेच नसल्याचं समोर आलं.

अलेक्झांडर यांनी राजीनामा दिला
जागतिक आरोग्य संघटना तसेच जगभरातील तज्ज्ञांनी रशियन लशीच्या सुरक्षेबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. त्यानंतर अलेक्झांडर यांनी राजीनामा दिला आहे. डॉक्टर अलेक्झांडर यांनी सांगितले की, लस तयार करण्यासाठी वैद्यकीय शास्त्रांच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले. तसेच लस बनवण्यासाठी घाई झाल्याचा आरोप त्यांनी केला. sputnik-v लशीसाठी आवश्यक ती मंजुरी घेण्यात आली नव्हती आणि घाईघाईत त्याची घोषणा करण्यात आल्याचं अलेक्झांडर यांनी सांगितलं. तसेच ही लस सुरक्षित असेल याबद्दल शाश्वती नसल्याचं ते म्हणाले. अलेक्झांडर हे रशियामधील सर्वोच्च डॉक्टरांपैकी एक मानले जातात.

रशियाने वैज्ञानिक डेटा सादर केला नाही
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांच्या मुलीला लशीचा पहिला डोस देण्यात आला तेव्हा तिला ताप आला होता. पण ती लवकरच बरी झाली आणि तिच्या शरीरात कोरोनाशी लढण्यासाठी अॅंटिबॉडीज तयार झाले.  पण हा दावा सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा सादर करण्यात आला नाही. रशियाने अजूनही या लशीच्या सर्व चाचण्या संबंधित वैज्ञानिक डाटा सादर केला नाही. तसेच लशीचे तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल पूर्ण करण्यात आले की नाही याबाबत जगभरात शंका निर्माण झाली आहे.