चित्रपटाचं ऑनलाईन तिकिटं बुक करताय ? ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बुक माय शो , पीव्हीआर सारख्या मोबाईल अॅप मधून चित्रपटांची तिकिटं ऑनलाईन बुक केली जातात . मात्र यावेळेला इंटरनेट हॅंडलींग फी म्हणून ग्राहकांकडून आव्वाच्या सव्वा रक्कम आकारली जाते. आता तिकीट बुक करताना ही इंटरनेट हॅंडलींग फी भरण्याची गरज नसल्याचे ‘आरटीआय’ मध्ये समोर आले आहे. RBI ने माहितीच्या अधिकारांतर्गत ही बाब समोर आणली आहे.

मर्चंट डिस्काऊंट रेट – एमडीआर नियमांचं उल्लंघन

याबाबत ‘फोरम अगेन्स्ट करप्शन’चे अध्यक्ष विजय गोपाल यांनी हैदराबादेतील ग्राहक कोर्टात धाव घेतली. बूक माय शो, पीव्हीआरविरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवली आहे . त्यानंतर रिझर्व्ह बँकेकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ‘ ग्राहकांकडून इंटरनेट हँडलिंग फी उकळण्याचा अधिकार चित्रपट तिकिटांचं ऑनलाईन बूकिंग करणाऱ्या प्लॅटफॉर्मना नाही, असं रिझर्व्ह बँकेने माहिती अधिकारा अंतर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केलं आहे . अशाप्रकारे अतिरिक्त फी आकारणं हे आरबीआयच्या व्यापारी सवलत दर ( मर्चंट डिस्काऊंट रेट-एमडीआर ) नियमांचं उल्लंघन असल्याचंही यात नमूद केलं आहे.
व्यापारी सवलत दर म्हणजे काय ?
क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून ग्राहकांकडून पैसे स्वीकारल्याबद्दल व्यापारी बँकेला जी रक्कम देतात, तिला व्यापारी सवलत दर (मर्चंट डिस्काऊंट रेट – एमडीआर) म्हणतात. अर्थातच ही रक्कम व्यापारी /दुकानदारांनी सोसायची असती , तिचा भार ग्राहकांवर पडता कामा नये. त्यामुळे ग्राहकांकडून इंटरनेट हँडलिंग फी आकारणं अवैध असल्याचंही म्हटलं आहे . समजा सिनेमाच्या तिकीटाची मूळ रक्कम जर २०० रुपये असेल, तर इंटरनेट हँडलिंग फीमुळे ही रक्कम २३० रुपयांपर्यंत जाते. त्यामुळे प्रेक्षकांना भुर्दंड सहन करावा लागतो.
चित्रपटांव्यतिरिक्त ‘या’ सर्व्हिसेसना देखील इंटरनेट हँडलिंग फी
चित्रपटाचे तिकीट बुक करण्याखेरीज घरबसल्या जेवण ऑर्डर करणे , कॅब बुक करणे अशा अनेक अँप्सना देखील इंटरनेट हँडलिंग फी आकारली जाते आणि त्याद्वारे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागते .असंही विजय गोपाल म्हणाले . नागरिकांनी एकत्र येऊन याविरोधात आवाज उठवावा , अशी मागणी त्यांनी केली आहे.