‘या’ तारखेच्या आसपास सुरू होऊ शकतात शॉपिंग मॉल, सिनेमा हॉलमध्ये लागू होऊ शकतात ‘हे’ नियम

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  भारतातील लॉकडाऊन आणखी १४ दिवसांसाठी वाढवण्यात आले असून हा लॉकडाऊनचा चौथा टप्पा असे, जो सोमवारी १८ मेपासून सुरू झाला आणि ३१ मे रोजी संपणार आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, पीव्हीआरचे अध्यक्ष आणि एमडी अजय बिजली यांनी सांगितले की, १५ जूनच्या आसपास शॉपिंग मॉल्स सुरू होऊ शकतात. त्याच्या १-२ आठवड्यांनंतर चित्रपटगृहे सुरू करण्यासही मान्यता दिली जाऊ शकते. मार्च अखेरपासून देशातील सर्व शॉपिंग मॉल्स आणि चित्रपटगृहे बंद आहेत.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजे एनडीएमएने केंद्र सरकार आणि राज्यांना लॉकडाऊन सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या. यानंतर गृहमंत्रालयाने नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. त्यानुसार चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, जिम, जलतरण तलाव, एंटरटेनमेंट पार्क्स, सभागृह व असेंब्ली हॉल बंद राहतील.

आता येणार सिनेमागृहात बसण्याचे नवीन नियम-

अजय बिजली पुढे म्हणाले की, चित्रपटगृहातील बैठकीत काही बदल केले जाऊ शकतात. जसे कुटुंब आणि ग्रुपला एकत्र बसवले जाईल. तर इतर लोकांना काही अंतरावर बसवले जाईल. लॉकडाऊननंतर चित्रपट लवकरच प्रदर्शित होऊ शकतात. तसेच सगळ्या लोकांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करणे सोपे काम नाही.

यापूर्वी १५ मे रोजी पीव्हीआरने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर चित्रपटांच्या प्रदर्शनासंदर्भात एक विधान केले होते. त्यातून त्यांनी चित्रपट निर्मात्यांना चित्रपटगृह सुरू होईपर्यंत त्यांचे चित्रपट प्रदर्शित न करण्याची विनंती केली.

पीव्हीआरचे सीईओ कमल ज्ञानचंदानी म्हणाले की, ‘आमचा विश्वास आहे की, थिएटर रिलीज हा आमच्या चित्रपट निर्मात्यांची मेहनत आणि रचनात्मक प्रतिभा अनुभवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. हे दशकांपासून भारतातच नव्हे तर जगभरात घडत आले आहे.’