PWC सर्व्हे : कंपन्यांच्या वाढीसाठी भारत जगातील 5 वे सर्वात चांगले ठिकाण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरातील दिग्गज कंपन्यांच्या वाढीच्या दृष्टीने भारताला पाचवा सर्वात चांगला देश म्हणून निवडले आहे. पुढील 12 महिन्यांच्या अंदाजानुसार, भारताला 8 टक्के मते मिळाली आहेत. जागतिक आढावा फर्म प्राईसवॉटर हाऊसकूपर (पीडब्ल्यूसी) ने जगभरातील सीईओवर केलेल्या 24व्या वार्षिक सर्वेत हा खुलासा केला आहे.

पीडब्ल्यूसीने 100 देशांसाठी 5,050 मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांमध्ये (सीईओ) केलेल्या सर्वेत म्हटले आहे की, ब्रेग्झिटनंतर ब्रिटनला एका स्थानाचा फायदा झाला, तर भारत एक स्थान खाली गेला आहे. अमेरिका पहिल्याप्रमाणेच सर्वोच्च स्थानी आहे, जिथे 35 टक्के सीईओंनी पुढील 12 महिन्यापर्यंत वेगवान वाढीचा विश्वास व्यक्त केला आहे.

चीन दुसर्‍या स्थानावर आहे, ज्यावर 28 टक्के सीईओंनी विश्वास व्यक्त केला आहे. जर्मनी 17 टक्के मतांनी तिसर्‍या स्थानावर आहे, तर ब्रिटन आता चौथ्या स्थानावर आले आहे. यावर 11 टक्के सीईओंनी 12 महिन्यांचा विश्वास व्यक्त केला आहे. ऑस्ट्रेलियाला मागे टाकत जपान सहाव्या स्थानावर पोहचले आहे.

76 टक्के सीईओंना अपेक्षा, 2021 मध्ये सुधारणार अर्थव्यवस्था
सर्वेमध्ये 76 टक्के सीईओंनी 2021 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्यावर विश्वास व्यक्त केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, महामारीनंतर व्यापारी विश्वास विक्रमी स्तरावर पोहचला आहे. मात्र, जगातील अनेक देशांमध्ये सीमांवर सुरू असलेला तणाव आणि टॅक्सच्या मुद्द्यांनी नव्या चर्चेला जन्म दिला आहे.

व्यापारी मुद्द्यांवर चीन आणि जर्मनीमध्ये अनेक वाद आहेत. दोन्ही देशांना निर्यात आधारित वाढ मिळवायची आहे. असे मुद्दे वेळीच सोडवले गेले तर जागतिक अर्थव्यवस्था पुढे जाण्यास मदत होईल.

उदाहरणार्थ, व्यापार युद्धानंतर अमेरिकन सीईओ आता चीनमध्ये आपल्या कंपन्यांची वाढ पहात नाहीत. तेथील 78 टक्के सीईओ आता मेक्सिको आणि कॅनडाकडे झुकत आहेत. याच कारणामुळे 2020 मध्ये चीनच्या 1 टक्के पुढे राहणार्‍या अमेरिकेने आता 7 टक्केचे अंतर केले आहे.