home page top 1

निवडणुकीनंतर ‘दोस्त दोस्त ना रहा’ ; फोडली एकमेकांची डोकी

अलिबागमध्ये शेकाप-काँग्रेस कार्यकर्ते भिडले

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या हातात हात घालून प्रचार करणारे शेकाप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते निवडणुकीनंतर मात्र एकमेकांना लाथा घालताना दिसून आले. शेकाप आणि काँग्रेसचे कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी फोडली. या घटनेत शेकापचे दशरथ पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा प्रकार अलिबाग तालुक्यातील सारळ दत्तपाडा येथे झाला.

सारळ दत्तपाडा येथील एका कामाच्या ठेक्यावरून दोन्ही पक्षांच्या कार्य़कर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. यामध्ये दोन्ही गटातील कार्य़कर्ते जखमी झाले असून पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. सारळ दत्तपाडा येथील डोंगरावर एका बिल्डरच्या बंगलो स्किमचे काम सुरु असून या ठिकाणी ही हाणामारी झाली.

बिल्डरच्या बंगलो स्किमच्या कामावरून शेकाप व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. काँग्रेसचे कार्यकर्ते राजेंद्र ठाकूर, सारळचे सरपंच अमित नाईक आणि शेकापचे दशरथ पाटील यांच्या सोमवारी जोरदार वादावादी झाली. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटांनी लोखंडी सळया, काठ्यांनी एकमेकांना मारण्यास सुरुवात केली. यामध्ये दशरथ पाटील गंभीर जखमी झाले.

या प्रकरणात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर सारळचे सरपंच अमित नाईक यांनी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून यामध्ये त्यांनी खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे करीत आहेत.

Loading...
You might also like