‘प्यार किया तो डरना क्या ?’, शिवसेना ‘या’ नेत्याकडून धनंजय मुंडेंची पाठराखण

जालना : पोलीसनामा ऑनलाईनः –  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर विरोधी पक्षांकडून चौफेर टीका होत आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने मात्र मुंडे यांची पाठराखण केली आहे. प्यार किया तो डरना क्या…, अशा शब्दात शिवसेनेचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांनी मुंडेंचा बचाव केला आहे.

एका महिलेने केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे राज्य सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे अडचणीत आले आहेत. विरोधकांकडून जोरदार टीका होत असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तर आघाडी सरकारमधील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी मुंडेंचा त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे.

अब्दुल सत्तार म्हणाले की, संबंधित महिलेसोबतच्या संबंधांबाबत धनंजय मुडे यांनी सोशल मीडियावरून कबुली दिली आहे. दोघांच्या संमतीने असलेल्या संबंधांची त्यांनी कबुली दिली आहे. यावेळी सत्तार यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे यांना उद्देशून काढलेल्या उद्गारांचीही आठवण काढली आणि प्यार किया तो डरना क्या, असे बाळासाहेब तेव्हा म्हणाले होते, असे सांगितले. तसेच भाजपाच्या अनेक नेत्यांनीही निवडणुकीत दिलेल्या शपथपत्रामध्ये माहिती लपवली होती. अशा नेत्यांची नावे आपण लवकरच जाहीर करू, असा इशाराही अब्दुल सत्तार यांनी दिला आहे. दरम्यान,मुंडे यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थिती लावली. तसेच दिवसभरात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेटली आहे.