सौदी अरेबिया आणि UAE नंतर आता कतारनेही पाकिस्तानला दिला ‘धक्का’

नवी दिल्ली : वृतसंस्था – कोरोना साथीच्या धोक्यासोबतच आर्थिक संकटातून उभारण्याचा प्रयत्न करीत असलेल्या पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला आहे. सौदी अरेबिया आणि युएईनंतर आता कतारने पाकिस्तानच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यास नकार दिला आहे. सुरुवातीला पाकिस्तानमध्ये गुंतवणूकीची आवड दर्शविल्यानंतर कतारने आता आपले पाय मागे घेतले आहेत. इस्लामाबाद विमानतळ, जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अल्लामा इक्बाल विमानतळ यांच्या मालकीच्या हस्तांतरणाबाबत कतारने पाकिस्तान सरकारशी चर्चा केली होती. यासाठी पाकिस्तान सरकारच्या मालकीच्या कंपनीत 40 टक्के हिस्सा खरेदी करण्यास कतार गुंतवणूक प्राधिकरणानेही रस दर्शविला होता. दरम्यान, विमानतळाच्या व्यावसायिक कामांना आऊटसोर्स करण्याच्या सरकारच्या प्रस्तावापासून कतारने गुंतवणूकीकडे पाठ फिरविली आहे.

पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, विमानतळावर पार्किंग सेवा, टक शॉप सर्व्हिसेस, रेस्टॉरंट्स यासारख्या सेवांना पाकिस्तानला आउटसोर्स करायचे आहे, जेणेकरून विमानतळाचे ऑपरेशनल कंट्रोल त्याच्याचजवळ असेल. परंतु कतार इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटीने याच प्रस्तावाला कारण असल्याचे सांगून गुंतवणूक करण्यास नकार दिला आहे.

गेल्या वर्षी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान कतार येथे गेले होते. या दौर्‍यादरम्यान कतारच्या अमीरने पाकिस्तानच्या विमानतळांवर गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु त्यानंतर काम या दिशेने पुढे जाऊ शकले नाही. कतारने पाकिस्तानमध्ये 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. माहितीनुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कतारमध्ये गुंतवणूक आणण्यात अपयशी ठरल्याबद्दल अधिकाऱ्यांविषयी नाराजी व्यक्त केली आहे. सौदी अरेबिया आणि युएई आधीच या प्रकल्पातून बाहेर गेले आहेत. कतार बाहेर पडल्यामुळे पाकिस्तानच्या विकास प्रकल्पाला मोठा धक्का बसला असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, या प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी आणि इतर पर्यायांचा शोध घेण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे.