पुणे : तळजाई येथील ‘त्या’ वादग्रस्त प्रकल्पाच्या बैठकीत आयुक्तांसमोर 2 ज्येष्ठ नगरसेवकात ‘हमरीतुमरी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तळजाई टेकडीवरी पार्किंग शेड उभारून त्यावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्या विषयासंदर्भात पालकमंत्र्यांच्या सूचनेवरून पालिका आयुक्तांनी बोलावलेल्या बैठकीतमध्ये दोन ज्येष्ठ नगरसेवक एकमेकांना भिडले. एकमेकांचा ढोंगी, सोंगी, बदमाश, चोर म्हणण्यापर्यंत वाद विकोपाला गेला. हमरीतुमरीवर आलेल्या या दोन नगरसेवकांना शांत करण्यासाठी आयुक्त शेखर गायकवाड यांना मध्यस्थी करावी लागली. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास आयुक्तांच्या कक्षातच हा प्रकार घडल्याने याची चर्चा आज दिवसभर पालिकेत होती.

तळजाई टेकडीवरील 108 एकरमध्ये ऑक्सिजन पार्क (वन उद्यान) उभारण्यात येत आहे. यातील काही क्षेत्रावर पार्किंग शेड उभारून त्यावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार होता. मात्र, याठिकाणी वन उद्यानाचे आरक्षण असल्याने त्याठिकाणी हा प्रकल्प शक्य नसल्याने हा प्रकल्प रद्द करण्यात आला. ग्रेसचे नवनियुक्त गटनेते बाबा बागूल यांनी यासंदर्भात मागील आठवड्यात पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना माहिती दिली. त्यावेळी ज्येष्ठ नगरसेवक सुभाष जगताप ही उपस्थित होते. अजित पवार यांनी दोघांचे म्हणणे ऐकून घेत महापालिका आयुक्तांना स्थानिक आमदार, सर्व नगरसेवक यांची एकत्र बैठक घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.

आयुक्तांनी बागूल आणि जगताप यांना चर्चेसाठी बोलावले होते. चर्चे दरम्यान दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. बागूल यांनी प्रकल्पाचे महत्त्व सांगत बजेटमध्ये तरतूद करण्याची मागणी केली. तर जगताप यांनी बागूल यांचे सर्व मुद्दे खोडून काढत प्रकल्पाला मान्यता नसल्याचे सांगितले. तसेच यासंदर्भातील निर्णय शासनाकडे प्रलंबित असल्याचे सांगितले. प्लॉटधारकांनी पालिकेविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या आणि नुकत्याच पालिकेच्या बाजुने लागलेल्या निकालाचा संदर्भ जगताप यांनी दिला. हा वाद सुरु असताना बागुल यांनी आम्ही निवडून आलेलो नगरसेवक आहोत, स्विकृत नाही असे म्हणताच दोघांमध्ये वाद सुरु झाले. अरे-तुरे वरून बोलताना एकदम वाद पेटला. वाद विकोपाला गेल्याने काही अधिकारी देखील त्या ठिकाणी आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आयुक्तांनी मध्यस्थी करत दोघांना शांत केले.