गोधडी बनवण्याची कला सातासमुद्रापार ‘नेणारी सुपरवुमन’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (प्रेरणा परब-खोत) – खरंतर आजीनं शिवलेली गोधडी नेहमीच आपल्याला मायेची उब देत आलीय. आज या गोधड्यांची जागा ब्लॅंकेटने घेतली आहे. पण सांगलीत राहणाऱ्या श्रुती दांडेकर यांनी हीच गोधडी बनवण्याची कला सातासमुद्रापार नेली आहे. इतकंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याची सुंदर कलाकृती एका ‘क्विल्ट’ वर म्हणजेच ‘गोधडी’वर साकार केली आहे. विशेष म्हणजे तब्बल २० हजार ८८८ कापडी तुकडे, २८८ रंगछटा आणि १९ बाय ८ फुटांचा थक्क करणारा राज्याभिषेक सोहळा त्यांनी गोधडीवर साकारला आहे. मोठ्या दिमाखात या गोधडीचे अनावरण बुधवारी करण्यात आले. ही ‘क्विल्ट’ म्हणजेच गोधडी २५ ते २७ जानेवारी चेन्नई येथे होणाऱ्या इंडिया क्विल्ट फेस्टिवलमध्ये सहभागी होणार आहे.

आता या फेस्टिवलमध्ये छत्रपतींच्या राज्याभिषेकाची गोधडी हे प्रमुख आकर्षण असणार आहे. तत्पूर्वी सांगलीच्या अभाळमाया फाउंडेशनेने श्रुती दांडेकर यांची ही कलाकृती आणि छत्रपतींच्या इतिहासाला सांगलीकरांच्या प्रथम समोर आणण्याच्या उद्देशाने आज मोठ्या दिमाखात शानदार सोहळ्यात अनावरण केले आहे. दांडेकर यांच्या कला शिक्षिकेच्या हस्ते यावेळी या भव्यदिव्य शिवराज्याभिषेकाच्या सुंदर कलाकृतीचे अनावरण संपन्न झाले.

‘क्विल्ट’ नक्की आहे तरी काय
भारतात पूर्वीच्या काळी घरातील अनेक जुन्या कपड्यापासून गोधडीची निर्मिती केली जात असे. काळानुसार ही गोधडी लुप्त होत चालली आहे. मात्र, या सांगलीच्या श्रुती दांडेकर यांनी हा गोधडीला आज नवे स्वरुप प्राप्त करून दिले आहे. गोधडीच्या स्वरूपातील केल्या जाणाऱ्या पेंटिंगला किंवा वॉल आर्ट ला ‘क्विल्ट’ असे त्या म्हणतात. त्यांनी २०१२ पासुन क्विल्टमध्ये पोर्ट्रेट करायला सुरुवात  केली  त्यांची आधिपासुन अशी मोठी कलाकृती करण्याचा विचार होता. पण एवढ्या मोठया आकाराचे आर्ट क्विल्ट करणे हे मोठे आव्हान होते पण रस्त्यावरून जाताना सहजच होर्डिंग पाहिलं आणि त्यांनी ही कलाकृती करण्याचे काम हाती घेतले. पूर्णपणे हाताने तयार केलेली ही कलाकृती आहे.  पुण्याच्या मनीषा अय्यर यांच्या स्टुडियो बानी मध्ये याचं संपूर्ण शिवणकाम केलं आणि अशाप्रकारे ही कलाकृती साकार केली.

परदेशात सांगितली गोधडी बनवण्याची कला
श्रुती दांडेकर यांची कला सातासमुद्रापार पोहचली आहे. देशात आणि परदेशातही त्यांच्या मोठ्या प्रमाणात या गोधडीला मागणी आहे. २०१५ साली ‘क्विल्टकॉन ‘ नावाच्या एका परदेशात झालेल्या परिषदेमध्ये श्रुती दांडेकर यांनी सहभाग घेतला होता. यावेळी या परिषदेला जवळपास ७००० लोक उस्थित होते. सभागृह खचाखच भरला होता आणि त्यात परदेशी माणसं प्रामुख्याने होती. यावेळी श्रुती यांनी भारताच्या पारंपारिक गोधड्या बनवण्याच्या कलेविषयी माहिती दिली होती. आता गोधडी बनवण्याच्या या कलेचे प्रशिक्षण देण्यासाठी येत्या फेब्रुवारी महिन्यात त्या अमेरिकेला जाणार असल्याची माहिती श्रुती यांनी ‘पोलिसनामा’शी बोलताना दिली. इतर महिलांना ही कला शिकवण्यासाठी श्रुती दांडेकर या सांगलीबरोबर पुणे, मुंबई, चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद येथे वर्कशॉप घेतात. त्यांच्या या कामात त्यांच्या कुटुंबाची मोलाची साथ त्यांना मिळते असे श्रुती म्हणाल्या.