‘रणबीर-आलियापेक्षा चांगले कलाकार शोधून दाखवा’, ‘हा’ बॉलिवूड डायरेक्टर ‘भडकला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर नेपोटीजमवर आजही बोललं जात आहे. करण जोहरसह अनेक सटार किड ट्रोल होत आहेत. यात आलिया भट, सोनम कपूर, अनन्या पांडे, सोनाक्षी सिन्हा असे अनेकजण आहेत. डायरेक्टर आर बाल्की यांनी यावर त्यांचं मत मांडलं आहे. स्टार किड्सच्या ट्रोलिंगवरून त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत आर बाल्की यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. आर बाल्की म्हणाले, “हे नाकारता येण्यासारखे नाही. हे सर्वत्र आहे. एकदा विचार करा अंबानी, बजाज, महिंद्रा यांच्या वडिलांनीही त्यांचा बिजनेस त्यांच्या मुलाकडे सोपवला आहे. मुकेश अंबानी हा बिजनेस सांभाळू शकत नाही इतर कोणी सांभाळायला हवा असा विचार कोणी केला का. समाजातील प्रत्येक स्तरावर हे सुरूच असतं. एखादा भाजी विक्रेतासुद्धा त्याचा बिजनेस मुलाकडे सोपवतो. या विषयावर चर्चा करणं म्हणजे मुर्खपणाच आहे.”

आर बाल्की पुढे म्हणाले, “किड्स स्टार्सला मोठा फायदा असतो का असं विचारलं तर मी सांगेन हो असतो. परंतु जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटेही आहेत. मला एकच सांगायचं आहे की, आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्यापेक्षा चांगले कलाकार मला शोधून दाखवा मग आपण बोलू. आपण त्यांना असं बोलून त्यांच्यासारख्या चांगल्या कलाकारांवर अन्याय करत आहोत. आलिया भटच्या अभिनयाचं कौतुक करण्याऐवजी लोक तिला एका निर्मात्याची मुलगी म्हणून ट्रोल करत आहोत.” असंही ते म्हणाले.