आर. आर. आबांचे शेवटचे शब्द काय होते ? कन्या स्मिता यांनी शेअर केली स्मृतिदिनानिमित्त आठवण

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर. पाटील (आबा) यांचा आज 6 वा स्मृतीदिन. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त आबांचे शेवटचे शब्द काय होते हे सांगत आबांच्या कन्या स्मिता पाटील यांनी व्हॉट्सॲप स्टेट्सला एक आठवण शेअर केली आहे.

आर. आर. पाटील यांच्यावर कर्करोगाच निदान झाल्याने त्यांच्यावर ब्रीच कॅँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. तेंव्हा त्यांना बोलायला त्रास होत असल्याने ते कागदावर लिहून संवाद साधत होते. स्मिता पाटील यांनी व्हॉट्सॲप स्टेट्सला एक आठवण शेअर केली आहे. त्यात स्मिता पाटील यांनी लिहिले आहे की, 12 फेब्रुवारी 2015 रोजी आबांनी आपल्या हातांनी लिहून राज्यात काय चालले अशी विचारणा केली होती. ते माझ्यासाठी खूप खास आहेत, कारण आबा हे नेहमी लोकांचा विचार करायचे असे त्या म्हणाल्या.

सुरुवातीला महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा गाजवणारे आबा, जिल्हा परिषदेला निवडून आले. तिथून तासगाव कवठेमहंकाळ विधानसभा मतदारसंघातून ते आमदार झाले. राज्याचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री अशा अनेक मोठ्या पदांवर त्यांनी घेतलेली झेप आजही सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना राजकारणात येण्यासाठी प्रोत्साहित करत असते.