आलियाचा ‘राझी’ प्रेक्षकांनाही ‘राजी’

मुंबई : वृत्तसंस्था
आलिया भटचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘राझी’ प्रेक्षकांच्या पसंतीस चांगलाच उतरलेला दिसतो. यानंतर आलिया भटच्या अभिनयाचे सगळीकडे विशेष कौतुक होत आहे. चित्रपटाची खरी ‘हिरो’ आलिया असल्याचे म्हटले जात आहे. बॉक्स ऑफिस इंडिया डॉट कॉमच्या अहवालानुसार, दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्या या चित्रपटाने रविवारी 14.11 कोटी रुपयांचा गल्ला जमविला आहे. यानुसार या चित्रपटाची विकेंडची कमाई 32.94 कोटी रुपये इतकी झाली आहे. जंगली पिक्चर्स आणि धर्मा प्रॉडक्शन यांचा हा चित्रपट आहे.

पहिल्या दिवशी ‘राझी’ या सिनेमाने 7.53 कोटी रुपयांची कमाई केली होती आणि दुसऱ्या दिवशी या सिनेमाने चक्क 50 टक्के अधिक म्हणजे 11.30 टक्के कमाई केली. हा सिनेमा 2018 मध्ये प्रदर्शनाच्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा पाचवा चित्रपट ठरला आहे.

‘राझी’ या चित्रपटाची कथा 1971 मध्ये झालेल्या इंडो-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर आहे. यात एक भारतीय मुलगी पाकिस्तानी लष्कर अधिकाऱ्यासोबत लग्न करुन देशासाठी गुप्तहेर म्हणून काम करते.

या चित्रपटात आलिया भट आणि विकी कौशलसह जयदीप अहलावत, शिशिर शर्मा, रजित कपूर, सोनी राजदान, आरिफ जकारिया आणि अमृता खानविलकर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. आता पर्यंतच्या चित्रपटांमध्ये तिचा हा सर्वात उत्कृष्ट अभिनय असलेला चित्रपट असल्याची चर्चा आहे.