दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का ; हा’ खेळाडू आयपीएलमधून बाहेर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा १२ व्या हंगामासाठी आयपीएलमधून बाहेर पडला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे रबाडाला विश्रांतीचा सल्ला दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने दिला आहे. त्यामुळे त्याला आयपीएलमधील उर्वरीत लढती खेळता येणार नाहीत. त्यामुळे सहा वर्षांनंतर प्रथमच आयपीएलच्या प्ले-ऑफ मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला आहे.

रबाडा आयपीएलमधील हा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला आहे, त्याने १२ सामन्यात २५ विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे दिल्लीची टीम प्लेऑफवर पोहोचली आहे. सहा वर्षानंतर दिल्ली संघ प्लेऑफवर पोहोचला आहे. पाठीला झालेल्या दुखापतीमुळे त्याला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यालाही मुकावे लागले होते. दिल्लीच्या टीमला ४ मे रोजी फिरोज शाह कोटला मैदानावर राजस्थान रॉयल्सचा सामना करावा लागणार आहे.

याविषयी बोलताना रबाडा म्हणाला की , ‘शेवटच्या टप्प्यावर ही स्पर्धा सोडणे माझ्यासाठी खूप दुःखदायक आहे. परंतु आता विश्वचषक स्पर्धेला केवळ एक महिन्याचा अवधी बाकी राहिला आहे. त्यामुळे मी सर्वांच्या संमतीने आईपीएल मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यासाठी हे सिझन खूपच महत्वाचे राहिले आहे. मला पूर्ण खात्री आहे की माझा संघ नक्की विजयी होईल.’

विश्वकरंडकासाठी आता अवघे काही दिवस राहिले असल्याने आफ्रिका कोणत्याही प्रकारचा धोका पत्करण्याच्या तयारीत नाही. विश्वचषक स्पर्धेसाठी रबाडा हा दक्षिण आफ्रिका संघाचा महत्वाचा खेळाडू आहे.

You might also like