पुरंदर मध्ये सशाची शिकार करणाऱ्या चौघांना शिक्षा

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन (चंद्रकांत चौंडकर) – रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून वनपरिक्षेत्रामध्ये सशाची शिकार करणे काही चोरांना चांगलेच महागात पडले आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका मृत सशासह या सर्वाना रंगेहाथ पकडले आहे. विशेष म्हणजे यामध्ये सख्या तीन भावांचा समावेश असून एकूण चौघांना अटक केली आहे. या सर्वाना सासवड येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.रामा मारुती शिंदे(वय – २४),अजय मारुती शिंदे (वय – २२) आकाश मारुती शिंदे( वय – २०) आणि सुनील रामचंद्र शिंदे,(वय – २१) सर्व राहणार सध्या सासवड, ता. पुरंदर, मूळ रा. लिंपणगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दि. २३ रोजी पहाटे १ ते ५ च्या दरम्यान पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील आंबळे गावच्या वनक्षेत्रात वरील आरोपी ससे पकडण्यासाठी आल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर भोर येथील उपविभागीय वन अधिकारी आशा भोंग, सासवडच्या वनपरिक्षेत्राधिकारी जयश्री जाधव, जेजुरीचे वनपाल युवराज पाचारणे, आंबळे गाव चे वनरक्षक गणेश पवार, तसेच सासवड आणि नसरापूर येथील वनक्षेत्रातील वन कर्मचारी यांनी आंबळे वन क्षेत्रात पहाटेच्या वेळी सापळा लावला असता वरील चारही आरोपी सुमारे ६ ते ७ कुत्र्यांच्या सहायाने ससे पकडण्यासाठी आल्याचे दिसून आले. तसेच त्यांच्याकडे एक मृत ससा आढळून आला.

त्यामुळे या सर्व आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्यावर वन परिक्षेत्र हद्दीत बेकायदा प्रवेश करणे, वन्य प्राण्यांची बेकायदा शिकार करणे आणि त्यांना क्रूरपणे ठार मारणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून सासवडच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २७ पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत बोलताना सासवडच्या वनपरिक्षेत्र अधिकारी जयश्री जाधव यांनी सांगितले की, वन्य प्राण्यांची शिकार करणे अथवा त्यांना ठार मारणे कायद्याने गुन्हा असून अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल. त्याच प्रमाणे आपल्या भागात अशा प्रकारच्या घटना रात्रीच्या वेळी घडत असल्यास अशा घटना रोखण्यासाठी आपल्या गावातील वनरक्षक तसेच वन अधिकाऱ्यांना माहिती देवून सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like