D-Mart चे राधाकृष्ण दमानी बनले भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती, अनेक दिग्गजांना सोडलं मागे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्टॉक मार्केटचे दिग्गज गुंतवणूकदार आणि डी-मार्ट रिटेल चेन चालविणारी कंपनी अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्केटचे संस्थापक राधाकृष्ण दमानी भारतातील दुसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. गेल्या आठवड्यात अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्केटचे शेअर्स ५ टक्क्यांनी वधारले. यामुळे दमानींची नेट वर्थ वाढून त्यांची संपत्ती १७.८ अब्ज डॉलरवर (सुमारे १,२५,००० कोटी रुपये) पोहोचली. फोर्ब्स रियल टाइम बिलिनियरीज इंडेक्सच्या मते, देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी असून त्यांची संपत्ती ५७.४ अब्ज डॉलर्स एवढी आहे. दुसऱ्या क्रमांकावर राधाकृष्ण दमाणी तर त्यांच्यानंतर एचसीएलचे शिव नाडर (१६.४ अब्ज डॉलर्स), उदय कोटक (१५ अब्ज डॉलर) आणि गौतम अडानी (१३.९ अब्ज डॉलर) यांनी स्थान पटकावले आहे.

मिस्टर व्हाईट :
दमानी नेहमी पांढर्‍या शर्ट आणि पांढऱ्या रंगाच्या पँटमध्ये दिसतात आणि हाच कपडा त्यांची ओळख बनला आहे, म्हणूनच त्याला ‘मिस्टर व्हाईट अँड व्हाइट’ असेही म्हणतात. ते शेअर बाजारातील प्रख्यात तज्ञ आणि गुंतवणूकदार आहे. त्यांनी आपल्या ज्ञान आणि व्यवसायाच्या बुद्धिमत्तेने डी-मार्टला भारतातील एक यशस्वी सुपरमार्केट चेन बनवले. गेल्या एका वर्षात अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्केटच्या शेअर्समध्ये ३० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आणि कंपनीचे बाजार भांडवल ३६,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढले आहे.

इतर कंपनीत गुंतवणूक :
ते मीडिया आणि मार्केटिंगपासून दूर राहतात आणि जास्त सोशल मीडियावरही सक्रिय नसतात. मार्च २०१७ मध्ये अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्केटचा आयपीओ आल्यानंतर ते भारताचे रिटेल किंग म्हणून ओळखले जाऊ लागले. २००२ मध्ये त्यांनी मुंबईतील उपनगरी भागातून किरकोळ व्यवसाय सुरू केला. याशिवाय दमाणी यांनी तंबाखूपासून बिअर उत्पादनापर्यंतच्या विविध कंपन्यांमध्ये शेअर्स खरेदी केले आहेत. ते मुंबईच्या अलिबागमधील १५६ खोल्यांच्या ब्ल्यू रिसॉर्टचे मालक आहे.

दरम्यान, 65 वर्षीय दमानी यांनी 2002 मध्ये किरकोळ व्यवसायात प्रवेश केला आणि मुंबईत पहिले दुकान सुरू केले. आता येथे २०० स्टोअर आणि सुमारे दीड लाख कोटी रुपये मार्केट कॅप आहे. वाॅरेन बफे ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचे मार्गदर्शकही दमाणी आहेत. तसेच या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्केटचा नफा ५३.३ टक्क्यांनी वाढला आहे. या काळात कंपनीला ३९४ कोटी रुपयांचा नफा झाला आहे.