राधाकृष्ण विखे पाटलांवर खुनाचा आरोप

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – केशव कुलकर्णी यांच्या मृत्युप्रकरणी संगनमताने खून केल्याचा गुन्हा नोंदविण्याबाबत सत्र न्यायालयात पुनर्विलोकन अर्ज करण्याची मुभा औरंगाबाद खंडपीठाने न्यायमूर्ती व्ही.एम. देशपांडे यांनी याचिकाकर्त्यला दिली आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, त्यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील यांच्यासह इतर तिघांविरुद्ध केशव कुलकर्णी यांच्या खून केल्याचा गुन्हा नोंदवावा, असा विनंती अर्ज राहता न्यायालयात करण्यात आला आहे.

अभियंता केशव कुलकर्णी यांची प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेजारील जमीन विखे यांना हवी होती. त्याअनुषंगाने विखे यांनी कुलकर्णींना ६ एप्रिल २०१२ रोजी कारखान्याच्या विश्रामगृहावर येण्यास सांगितले. त्यांना घेण्यासाठी विखेंचे वाहनचालक राजू इनामदार गेले. कारमधून जाताना कुलकर्णी यांनी विखे पाटील शेतजमीन विकण्यासाठी दबाव आणत असल्याचे वाहनचालक इनामदार यांना सांगितले. दरम्यान, विश्रामगृहावर बाळासाहेब विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, राजेंद्र विखे पाटील आणि त्यांचे सुरक्षारक्षक होते. याच्या दुसऱ्या दिवशी विश्रामगृहाच्या पाठीमागे केशव कुलकर्णींचा मृतदेह आढळला. त्यानंतर विखे पाटील यांनी कुलकर्णी यांच्या जमिनीचे खरेदीखत तयार करून विकत घेतल्याचा व्यवहार दाखवण्यात आला आहे, असं याचिकेत म्हटलं आहे.

मुळ तक्रार दाखल करणारे बापू दिघे यांना राजू इनामदार यांनी केशव कुलकर्णी यांचा कट रचून खून करण्यात आल्याची माहिती दिली. कुलकर्णी यांचे शवविच्छेदनही प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आल्याने त्यांचा मृत्यू कसा झाला, याचा अहवाल आला नाही. शिवाय तहसीलदारांनीही अभिलेख उपलब्ध नाही असं सांगितलं. त्यामुळे दिघे यांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी २०१६ मध्ये प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अर्ज दिला होता.

दरम्यान, अर्जावरील सुनावणीत चालक इनामदार, ग्रामविकास अधिकारी कविता आहेर यांची साक्ष न्यायालयाने नोंदवली. मात्र न्यायालयातील टंकलेखकाने निकालात राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव वगळल्याचाही आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. तसंच दोन्ही साक्षीदारांची पुन्हा साक्ष नोंदविण्यात यावी, हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. या निर्णयाविरोधात दिघेंनी अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत २८ मार्च रोजी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली.