‘विखे-पाटील नैराश्यात आहेत, त्यांच्या बोलण्याला महत्त्व देत जाऊ नका’

अहमदनगर : ऑनलाइन टीम – नगर जिल्ह्यातील दोन बडे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यातील राजकीय वैमनस्य सर्वश्रृत आहे. हे दोन नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र, मागील काही दिवसांपासून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटील यांच्या आरोपांना उत्तर देणं टाळलं आहे. असे असले तरी विखे पाटील थोरांतांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. मात्र आज विखेंच्या बोलण्याला फार महत्त्व देत जाऊ नका. ते नैराश्यात असल्याने असे बोलतात, असा सल्ला प्रसारमाध्यमांना बाळासाहेब थोरात यांनी दिला.

गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर संगमनेर शहरात जमावाने हल्ला केला. पोलिसांना धक्काबुक्की केली. तसेच त्यांची राहुटीही उखडून टाकली. यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा निषेध करताना विखे यांनी संगमनेर तालुक्यात लोकप्रतिनीधींचा वचक राहिला नसल्याची टीका केली होती. विखेंच्या टीकेला थोरात यांनी प्रत्युत्तर दिले.

संगमनेर मध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे. असे घडायला नको होती. पोलीस त्यांचे कर्तव्य पार पाडत असताना त्यांना ज्या पद्धतीची वागणूक दिली गेली. ती अत्यंत चुकीची आहे. जो चुकीचा वागला त्याला शिक्षा झालीच पाहिजे. मग तो कोणी का असेना. त्या पद्धतीने पोलिसांनी, प्रशासनाने काम करावे, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

यावेळी त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील काय बोलतात याला फार महत्त्व देत जाऊ नका. ते विरोधी पक्षाच्या भूमिकेतून नैराश्यातून बोलत असतात. त्यांच्या मतदारसंघात कधी चुकीचे काही घडत नाही, असे नाही. शेवटी मानवी स्वभाव आहे. विखे यांचे बोलणे नैराश्यातून येत असते. त्यामुळे त्यांना मीडियाने फार महत्त्व देऊ नये, असे माझे मत आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले..