राधाकृष्ण विखे पाटलांना भाजप प्रवेशासोबत मंत्रिपदाची लॉटरी ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखेपाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र आता भाजप प्रवेशसोबत विखेंना मंत्रिपदाचीही लॉटरी लागणार की काय अशी चर्चा आहे. यापूर्वी देखील विखे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा विखे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली आहे.

पक्षप्रवेशासोबत मंत्रिपद ?

पावसाळी अधिवेशन सुरू होण्याअगोदर विखे-पाटीलांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात असून त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.राधाकृष्ण विखे पाटलांच्या भाजप प्रवेशाची केवळ औपचारिकता शिल्लक अहे. पावसाळी अधिवेशन सुरू होण्याअगोदर विखे-पाटील यांचा पक्ष प्रवेश निश्चित मानला जात आहे.

तसेच त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची चर्चा देखील सुरू आहे. विखे यांच्या सोबत काँग्रेसचे काही आमदारही भापमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती एका खासगी वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. नगर दक्षिण मतदारसंघावरून झालेल्या वादातून राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी भाजप प्रवेश करून नगरवर महायुतीचा भगवा देखील फडकवला आहे. त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटलांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामाही दिला होता. तेव्हापासून त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे.