शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याची खंत वाटते : विखे-पाटील  

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे-पाटील यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील राजीनामा देणार का ? यासंदर्भात राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु होती. मात्र त्याबाबत पहिल्यांदाच विखे पाटील माध्यमांशी बोलले आहेत.

यावेळी बोलताना ते म्हणाले, मी असं ठरवलं होतं की याबाबत दोन दिवसात स्पष्टीकरण देऊ, मुलांसाठी संघर्ष केला हे चुकीचे आहे. राज्यात कोणत्या जागा निवडून दिल्या जाऊ शकतात याबाबत राष्ट्रवादी सोबत अनेकवेळा आमची चर्चा झाली. नगरच्या जागेसाठी आम्ही देखील त्यांच्यासोबत चर्चा केली. सलग तीन वर्षे म्हणजेच २००४, २००९, २०१४ साली राष्ट्रवादी पराभूत झाली होती. पण या सगळ्यात योग्य तो समन्वय घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न होता.

पवारांच्या त्या वक्तव्याची खंत –

आम्ही एकीकडे आघाडीची चर्चा करीत होतो तेव्हा पवार साहेबांनी आमच्या वडिलांबाबतचे म्हणजेच बाळासाहेब विखे पाटील यांच्याबाबत केलेले विधान हे दुर्दैवी होते. आज ते हयात नाहीत अशा वेळेला जेव्हा एखादे जेष्ठ नेते त्यांच्याबाबत बोलतात तेव्हा ही गोष्ट नक्कीच विचार करण्यासारखी आहे. पवारांच्या वक्तव्याची आम्हाला खंत आहे. हे सर्व चालू असताना तिकडे सुजयचा निर्णय झाला होता. आजोबांसंबंधी केलेल्या विधानामुळे सुजय देखील दुखावला गेला होता. त्यानंतर त्याने भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला.

काय म्हणाले होते पवार –

अहमदनगरच्या जागेबाबत शरद पवार म्हणाले होते की, “या ठिकाणी राष्ट्रवादीचेच उमेदवार उभे राहतील. यात निवडून येण्याचा वाद नाही. याच मतदारसंघामध्ये विखे म्हणजे बाळासाहेब विखे हयात नाहीत, त्यांचा पराभव आम्ही लोकांनीच केला होता. त्यावेळी निवडणुकीची जबाबदारी माझ्यावरच होती आणि त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी माझ्यावर केसही केलेली होती. त्यामध्ये माझा कॉन्स्टिट्यूशनल राईट्ससुद्धा रद्द केला होता. शेवटी सुप्रीम कोर्टात मला न्याय मिळाला. त्यामुळे ही सीट आम्ही जिंकू शकतो. ती जागा काँग्रेसकडे असतानाही विजय झाला नाही हा सुद्धा इतिहास आहे.”