राधाकृष्ण विखे-पाटील शिवसेनेच्या मंचावर, राजकीय चर्चांना उधाण

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – विरोधी पक्ष नेते पदाचा राजिनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील कोणती भूमिका घेणार कोणत्या पक्षात जाणार अशी चर्चा होती. आज संगमनेर येथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची सभा असून त्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी न जाता थेट शिवसेनेच्या व्यासपिठावर हजेरी लावली. राधाकृष्ण यांनी अचानाक शिवसेनेच्या व्यावसपिठावर आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

विरोधी पक्ष पदाचा राजिनामा दिल्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यांनी शिवसेनेच्या व्यासपिठावर उपस्थिती लावल्याने ते नेमके कोणत्या पक्षात जाणार अशी चर्चा सध्या सुरु आहे. मात्र, मुलगा सुजय हा भाजपमध्ये असल्याने ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

राधाकृष्ण विखे पाटील हे उद्या पत्रकार परिषद घेणार असून ते आपला निर्णय उद्या जाहीर करणार आहेत. दरम्यान, नितीन गडकरी यांची सभा होणार असून या सभेमध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.