राधाकृष्ण विखे-पाटील शनिवारी भूमिका जाहीर करणार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलेले राधाकृष्ण विखे पाटील हे त्यांची आगामी राजकीय भूमिका शनिवारी (दि. 27) स्पष्ट करणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले. राजीनाम्यानंतर विखे भाजपात प्रवेश करणार की काँग्रेसमध्ये राहणार आहे, यावरून राजकीय खल सुरू झाला आहे.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिला व पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी तो स्वीकारला, याची माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. विखे हे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे स्टार प्रचारक असूनही ते भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार असलेल्या पुत्राचा जाहीरपणे प्रचार करीत होते. त्यामुळे विखे यांची ही भूमिका पक्षश्रेष्ठी कितपत सहन करतात, असा प्रश्न पडला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नगर येथील जाहीर सभेत ते भाजपात प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू होती. मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवेश केला नाही. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच त्यांनी राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले होते. त्यापूर्वीच आज प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी विखे-पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला व राहुल गांधी यांनी तो स्वीकारला, असे जाहीर केले. यापूर्वीही अशोक चव्हाण यांनी त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींकडून कारवाई होईल, असे संकेत दिले होते. विखे यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला.

परंतु त्यांची आगामी राजकीय भूमिका काय असेल, याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राधाकृष्ण विखे-पाटील हे शनिवारी आपली राजकीय भूमिका जाहीर करतील, असे सांगितले जात आहे. विखे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करतात, काँग्रेसमध्येच राहतात की यापेक्षा वेगळी राजकीय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.