राधाकृष्ण विखे-पाटील काँग्रेसमध्येच राहणार ; भाजप उमेदवार डॉ. सुजय विखेंचा खुलासा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या महिन्याभरापासुन काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. एवढेच नव्हे तर ते अहमदनगर येथे होणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहिर सभेदरम्यान भाजपमध्ये प्रवेश करतील असे बोलले जात होते. मात्र, राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र आणि भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी सर्व चर्चांना पुर्णविरोम दिला आहे. राधाकृष्ण विखे-पाटील हे काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे डॉ. सुजय यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

वडिल काँग्रेसचे वरिष्ठ नेते असताना देखील मी भाजपामध्ये प्रवेश केला ही वैयक्‍तिक बाब असल्याचेही डॉ. सुजय विखे-पाटील म्हणाले. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रश्‍नच येत नाही. राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपमध्ये जाणार ही केवळ अफवाच ठरली आहे. दरम्यान, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जरी भाजपमध्ये प्रवेश केला नसला तरी ते सध्या पुत्र डॉ. सुजय यांचा म्हणजेच भाजपाच्या उमेदवाराचा अहमदनगरमध्ये जोरदार प्रचार करीत आहेत. मोदींच्या सभेची देखील त्यांनीच जोरदार तयारी केली असल्याचे पहावयास मिळाले आहे तर दुसरीकडे अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे-पाटील हे आमचेच काम करतात असे सांगितले होते.

You might also like